परभणी : शहरातील खासगी रुग्णालयाचे कोरोनाकाळातील ऑडिटिंगचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून, आतापर्यंत केवळ ६ रुग्णालयांचेच अहवाल पूर्ण झाले आहेत. अद्याप एकाही रुग्णाच्या नातेवाइकांना जास्तीचे गेलेले पैसे परत मिळाले नाहीत.
कोरोना संसर्गकाळामध्ये राज्य शासनाने रुग्णांवर उपचार करण्यासाठी दर निश्चित केले होते. या दरानुसार रुग्णांकडून रक्कम घेणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या देयकांचे ऑडिट करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. ९ एप्रिल २०२१ रोजी परभणी येथे महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास पवार यांच्या नियंत्रणाखाली समितीची स्थापना करण्यात आली. मनपाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी पथक प्रमुख असलेल्या या समितीमध्ये चार अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. या समितीच्या माध्यमातून शहरातील २४ रुग्णालयांचे ऑडिट करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी पाच पथकांची नियुक्ती करणार आहे. मात्र, आतापर्यंत केवळ सहा रुग्णालयांचे अहवाल पथकप्रमुखांकडे प्राप्त झाले असून, उर्वरित काम प्रलंबित आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांचे ऑडिट कधी पूर्ण होणार आणि कधी रुग्णांना न्याय मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२४ रुग्णालयांना नोटिसा
कोरोनाकाळात रुग्णांकडून घेतलेले देयके आणि एकूण उपचार केलेले रुग्ण यासंदर्भात माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी या स्वरूपाच्या नोटिसा शहरातील २४ रुग्णालयांना दिल्या आहेत. खाजगी रुग्णालय प्रशासनाकडून नोटिसांना प्रतिसादही देण्यात आला आहे; परंतु खाजगी रुग्णालयांची देयके प्राप्त होण्यास विलंब लागत आहे. आतापर्यंत केवळ सहा रुग्णालयांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. खासगी रुग्णालयांकडून प्रतिसाद दिला जात असला तरी देयके सादर करण्यास विलंब होत असल्याने अहवाल पूर्ण होण्यासही विलंब लागत असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.
एकाच नागरिकाची तक्रार
कोरोना संसर्गकाळात शहरातील खासगी रुग्णालयातून अधिकचे देयक घेतल्याची एकच तक्रार समितीकडे दाखल झाली आहे. ही तक्रार संबंधितांकडे तपासणीसाठी देण्यात आली असून, त्यादृष्टीने रुग्णालयाच्या देयकांची तपासणी केली जात आहे. या तक्रारीवर लवकरच अहवाल प्राप्त होईल, असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. प्रभाकर काळदाते यांनी सांगितले.
कोरोना संसर्गकाळात शहरातील खासगी रुग्णालयांच्या देयकांची तपासणी करण्यासंदर्भात पाच पथके नियुक्त केले आहेत. त्यांची कामे सुरू आहेत. येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होईल.
-प्रभाकर काळे,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मनपा परभणी