जिंतूर ते येलदरी या रस्त्याचे काम तीन वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. त्यासाठी साडेचार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने यासंदर्भात टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर एका कंत्राटदाराला हे काम सुटले. सदरील कंत्राटदाराने या रस्त्याच्या काही भागांतील एका बाजूचे मजबुतीकरण व अस्तारीकरणाचे काम केले. त्यानंतर पुढचे काम प्रलंबित ठेवले. वर्षभरानंतर हे काम सुरू करण्यात आले. जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात गतवर्षी याअंतर्गत डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने हा रस्ता उखडला. त्यानंतर गेल्या वर्षभरात एकूण ४ वेळा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले; परंतु प्रत्येक वेळी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हे काम उघडे पडले. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. काही अंतरावरच या विभागाचे कार्यालय आहे. असे असतानाही या कामाकडे या विभागातील अधिकाऱ्यांनी का दुर्लक्ष केले? असा सवाल उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांकडूनच अभय देण्यात येत असल्याने संबंधित कंत्राटदाराचे मात्र चांगलेच फावत आहे. त्यातूनच मार्च महिना आला की, बिलासाठी रस्त्याचे काम केल्यासारखे दाखवायचे. त्यानंतर बिल उचलून पुन्हा गायब व्हायचे, असा पायंडा गेल्या तीन वर्षांपासून या कंत्राटदाराने राबविल्याचे दिसून येत आहे. १२ महिन्यांत हे काम पूर्ण करायचे असताना तीन वर्षे झाले तरी ते पूर्ण झालेले नाही. याअनुषंगाने सार्वजिनक बांधकाम विभागाचे उपअभियंता कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
संभाजी ब्रिगेडने निवेदन देऊनही फरक नाही
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ते पुन्हा करण्यात यावे, या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीन काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. त्यानंतर दाेन दिवसांपूर्वी संबंधित कंत्राटदाराने हे काम पूर्ण केले; परंतु या कामाचाही सुमार दर्जा आहे. डांबरीकरण करताना योग्य ती जाडी ठेवलेली नाही. त्यामुळे हे काम किती दिवस टिकेल, याविषयी शंका उपस्थित होत आहे.