कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरण हा पर्याय आहे. प्रशासनाने लसीकरणासाठी पुढाकार घेतला असून, जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे आवाहन केले जात आहे. मद्यपान करणाऱ्यांना लस घेतल्यानंतर किती दिवस मद्यपान करता येणार नाही, याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. त्यामुळे मद्यपान करणाऱ्यांनी लस देताना काय काळजी घ्यावी, असाही प्रश्न निर्माण होतो. याविषयी वैद्यकीय तज्ज्ञांची संवाद साधला तेव्हा कोरोनाची लस घेण्यापूर्वी तीन दिवस आणि लस घेतल्यानंतर तीन दिवस असे सहा दिवस मद्यपान करता येणार नाही. या सहा दिवसांचे मद्यपानाचे पथ्य पाळले तर लसीकरण करून कोरोनापासून प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यामुळे मद्यपानाची सवय असणाऱ्यांनी किमान सहा दिवसांचे पथ्य पाळून स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित करावे, असे आवाहन केले जात आहे.
काय म्हणतात तज्ज्ञ
मद्यपानाने यकृताच्या कार्यावर परिणाम होतो. कोणत्याही लसीचा तसेच अन्न पचनाचे काम यकृताच्या माध्यमातूनच केले जाते. कोरोनाची लस घेण्यापूर्वी आणि नंतर तीन दिवस मद्यपान केले नाही तर यकृत त्याचे कार्य चांगल्या पद्धतीने करू शकेल. त्यामुळे किमान ६ दिवस लसीकरणासाठी मद्यपानाचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. अतिमद्यपान नेहमीच शरीरासाठी हानिकारक असते. अतिमद्यपानामुळे शरीराची प्रतिकार क्षमता कमी होते आणि कोरोनाची लस प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी घेतली जात आहे. त्यामुळे सहा दिवसांचे पथ्य पाळावे. त्यानंतरही अतिमद्यपान करू नये. ठरावीक मात्रेत मद्यपान घेण्यास हरकत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.