परभणी: जिल्ह्यात १५ ऑक्टोबर रोजी मतदान होत असून, संवेदनशील मतदान केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनाने शनिवारी ९0 सूक्ष्म निरीक्षकांची यादी तयार केली. त्यापैकी ६२ निरीक्षकांची त्या त्या मतदान केंद्रासाठी नियुक्ती होईल, अशी माहिती मिळाली.
दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने चारही विधानसभा मतदार संघातील संवेदनशील मतदान केंद्रांची घोषणा केली होती. ६९ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर केली होती. संवेदनशील मतदान केंद्रावर प्रशासन विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. या प्रत्येक मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे या मतदान केंद्रांवर अधिकचा पोलिस बंदोबस्तही राहील. केंद्रावरील दिवसभराच्या मतदानाचे छायाचित्रीकरणही केले जाणार आहे.
संवेदनशील मतदान केंद्रांची यादी जाहीर केल्यानंतर या केंद्रांवर नियुक्त करावयाच्या सूक्ष्म निरीक्षकांची यादी व त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण निश्चित करण्याचे काम जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्र्यंत सुरू होते. संवेदनशील मतदान केंद्रवरील सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्त झाल्यानंतर या निरीक्षकांच्या उपस्थितीत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघात २0, गंगाखेड विधानसभा संघात १२, पाथरीत १५ तर जिंतूर विधानसभा मतदारसंघातील २२ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती होणार आहे. /(प्रतिनिधी)
■ संवेदनशील मतदान केंद्रांसाठी नियुक्त केले जाणारे सूक्ष्म निरीक्षक हे केंद्र स्तरावरील अधिकारी असतात. किंवा बँकिंग क्षेत्रातील उच्च पदस्थ अधिकार्यांची देखील या पदावर नियुक्ती होते.
> प्रत्येक मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पाडली जाते.
> शनिवारी या सूक्ष्म निरीक्षकांच्या यादीची निश्चिती उशिरापर्यंत झाली. तसेच दिवसभरात कृषी विद्यापीठाच्या सभागृहात सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षणही पार पडले.