मागील दोन आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने जिल्हावासीयांच्या चिंता वाढविल्या आहेत. मंगळवारी आरोग्य विभागाला २ हजार ३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ४४४ अहवालांमध्ये २८३ आणि रॅपिड टेस्टच्या ५५९ अहवालांमध्ये १५३ जण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूमुळेही धास्ती वाढलेली आहे. मंगळवारी दिवसभरात शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६ आणि खासगी रुग्णालयातील ३ अशा ९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात ७ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. मागील आठवडाभरापासून दररोज कोरोना रुग्ण दगावत आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७ हजार २६२ झाली आहे. त्यात १३ हजार ४६१ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले. ४६० रुग्णांचा मृत्यू झाला असून, ३ हजार ३४१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. शहरातील जिल्हा रुग्णालयात ५५, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५४, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २२० रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयात ४०२ रुग्णांवर उपचार सुरू असून, होम आयसोलेशनमध्ये २ हजार ४२४ रुग्ण उपचार घेत आहेत.