परभणी: जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून आतापर्यंत ३ हजार ८५२ कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत लस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने आता प्रशासनाने जनजागृती सुरू केली आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक धास्तावलेले होते. आता हा संसर्ग कमी झाला आहे आणि कोरोनाची प्रतिबंधात्मक लसही उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लसीकरण केले जात आहे. मात्र, या लसीविषयी गैरसमज निर्माण झाल्याने लस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी हे. आरोग्य विभागाने जिल्ह्यात आता १२ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु केले आहे. आतापर्यंत ३हजार ८५२ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर सर्वाधिक ७२३ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. परभणी महानगरपालिकेच्या रुग्णालयात ६५०, जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३९७, जिल्हा रुग्णालयात २३५, पिंगळी प्राथमिक आरोग्य केंद्रात ९२, पूर्णा ग्रामीण रुग्णालयात ४८१, गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात ३९५, जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात २५४, मानवत ग्रामीण रुग्णालयात २०१, पाथरी १५४, पालम १२० आणि सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात १५० कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतले आहे.
महिला कर्मचाऱ्यांचा पुढाकार
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत २ हजार ७५१ महिला कर्मचाऱ्यांनी स्वत:हून लसीकरण करुन घेतले आहे. तर लस घेणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या ११०१ एवढी आहे.
जिल्ह्यात जनजागृती सुरू
कोरोनाची लस संपूर्णत: सुरक्षित असून लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. शनिवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्वत: लस घेऊन कर्मचाऱ्यांना आवाहन केले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात कलापथकाच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाची जनजागृती करुन लसीकरणाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.