परभणी : जिल्ह्यात रविवारी कोरोनाने २० रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत असल्याने जिल्हावासियांची धास्ती वाढली आहे.
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य यंत्रणेसह नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील दोन आठवड्यांपासून दररोज ६०० ते ७०० नागरिक कोरोनाबाधीत आढळत असल्याने जिल्ह्यात चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मागच्या एक आठवड्यापासून कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. दररोज कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. ही संख्याही वाढत असल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. ११ एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयातील १४ आणि खासगी रुग्णालयातील ६ अशा २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये १६ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांची धास्ती चांगलीच वाढली आहे.
कोरोनाबाधीत रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी ही संख्या कमी असली तरी प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांची संख्याही कमीच आहे. रविवारी १ हजार ४२३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ८८१ अहवालांमध्ये २१२ आणि रॅपिड टेस्टच्या ४४२ अहवालांमध्ये १९३ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आता एकूण रुग्ण संख्या २० हजार ५९० झाली असून, त्यापैकी १५ हजार ६६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ५२९ रुग्णांचा आत्तापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ४ हजार 401 रुग्ण उपचार घेत आहेत.
येथील जिल्हा रुग्णालयात ६८, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १६१, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २१३, अक्षदा मंगल कार्यालयात १३५ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ३ हजार ३०९ रुग्णांवर गृह विलगीकरणामध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.