परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील १२ हजार २४९ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. ९ डिसेंबरपासून किमान आधारभूत खरेदी अंतर्गत पणन फेडरेशनमार्फत खरेदी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २६२ शेतकऱ्यांचा ७ हजार ३१९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत व जिंतूर येथे सीसीआयच्या वतीने कापूस खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या परभणी शहरासह तालुक्यात आतापर्यंत कापूस खरेदी सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक चिंतेत होते. त्यानंतर परभणी येथील खरेदी केंद्रावर कापूस उत्पादक पणन महासंघाकडून कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने तालुक्यातील व शहरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या केंद्रावर कापूस विक्रीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पणन महासंघाकडून बाजार समितीमार्फत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक केले. त्यानुसार परभणी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील १२ हजार २४९ शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कापूस उत्पादन पणन महासंघाकडून ९ डिसेंबरपासून किमान आधारभूत खरेदी अंतर्गत शहरातील ओंकार कॉटन ॲग्रो इंडस्ट्रीज व राजराजेश्वर, कोटेक्स या ठिकाणी कापूस खरेदी सुरू करण्यात आली. या कापूस खरेदीचे उद्घाटन संचालक पंडितराव चोखट, बाजार समितीचे उपसभापती दिलीपराव आवचार, सोपानराव आवचार, गणेशराव घाटगे, रमेशराव देशमुख यांच्या हस्ते झाला. यावेळी ऑनलाईन नोंदणी केलेल्या पहिल्या ५ शेतकऱ्यांना टॉवेल टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी फेडरेशनचे उपव्यवस्थापक आर.ए. वाघ, ग्रेडर जाधव, कार्यालयीन अधीक्षक नखाते, बाजार समितीचे सचिव संजय तळणीकर, सहाय्यक सचिव सुरेश गरुड, प्रभूसिंह परिहार, कमल नारायण मानधने, बालू शर्मा, सुरेश शर्मा, मोतीलाल जैन, पवन पुरोहित यांची उपस्थिती होती.
पहिल्याच दिवशी ५ हजार ७२५ रुपयांचा भाव
शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे पणन फेडरेशनच्या वतीने कापूस खरेदी करण्यात येत आहे. कापसाच्या प्रतवारीनुसार बाजारभाव देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी कापसाला प्रतिक्विंटल ५ हजार ७२५ रुपयांचा भाव देण्यात आला. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणतेवेळी सातबारा, आधारकार्ड, बँक खाते झेरॉक्स सोबत आणावी, एकाच दिवशी एकाच वाहनातून ४० क्विंटल कापूस खरेदी करण्यात येणार आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती समशेर वरपूडकर, दिलीप आवचार, संजय तळणीकर यांनी केले आहे.