परभणी : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा संपला असून, शनिवारी लसीअभावी १२ केंद्रे बंद ठेवण्यात आली. शनिवारी दिवसभरात विविध केंद्रांवर असलेली लस पूर्णतः संपली असून, रविवारी सर्वच्या सर्व केंद्रे बंद ठेवावी लागणार आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, हा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला होता. सिरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन लसींचा १ लाख ४ हजार ८५० डोसेसचा साठा जिल्ह्याला प्राप्त झाला होता. ९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील ९४ हजार ५३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यामध्ये ५ हजार २४० लसींचा साठा शीतगृहात तर १३ हजार ५० डोसेस केंद्रनिहाय उपलब्ध करून दिले होते. आतापर्यंत होत असलेल्या लसीकरणाच्या अंदाजानुसार हे डोस ४ ते ५ दिवस पुरतील, असा अंदाज होता. मात्र, जिल्ह्यात लसीकरण करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने एकाच दिवसात हे डोसे संपले आहेत.
शनिवारी जिल्हा प्रशासनाने ५७ केंद्रांवर लसीकरण करण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यापैकी केवळ ४५ केंद्रांवरून लसीकरण होऊ शकले. १२ केंद्र लसीअभावी बंद ठेवण्यात आले. जिल्ह्यात उपलब्ध असलेली संपूर्ण लस शनिवारीच वापरण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी सर्वच्या सर्व केंद्रे बंद ठेवावी लागणार आहेत.
दिवसभरात ५ हजार डोसचा वापर
जिल्ह्यात उपलब्ध असलेले ५ हजार २४० डोस सर्व केंद्रांना वितरित करण्यात आले. दिवसभरात या केंद्रांवर नागरिकांची लसीकरणासाठी मोठी रांग लागली. त्यामुळे शनिवारीच हे डोस संपले आहेत. आता लसीचा साठा उपलब्ध नसून, प्रशासनाने नवीन मागणी नोंदविली आहे. सध्या तरी लस उपलब्ध होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
परभणी शहरातील पाच केंद्रे बंद
परभणी शहरात महापालिकेच्या हद्दीत ८ लसीकरण केंद्रे चालविली जातात. मनपाच्या आरोग्य विभागाकडे १० एप्रिल रोजी २१० लसींचा साठा उपलब्ध होता. हा साठा केंद्रांना वितरित करण्यात आला. तसेच केंद्रावरील शिल्लक असलेली लस असे मिळून केवळ जायकवाडीतील रुग्णालय, इनायतनगर आणि साखला प्लॉट येथील नागरी आरोग्य केंद्र अशा तीन केंद्रांवरच लसीकरण झाले. उर्वरित ५ केंद्रे बंद ठेवण्यात आली.