या एका प्रश्नाच्या उत्तरावर, यापुढे करिअर घडेल, किंवा बिघडेल!
समजा एका कंपनीत मुलाखत द्यायला जायचं आहे.
त्यावेळी मुलाखत घेणारे लोक आपल्याला काय काय विचारतील याचा साधारण अंदाज तुम्ही बांधता ना?
विचार करता की, त्या आपण निवडलेल्या विषयाची आपल्याला पूर्ण माहिती असलीच पाहिजे. पण तिथं गेल्यावर मुलाखत घेणारे विचारतात की, या डिग्रीऐवजी आणखी काय काय येतं तुम्हाला?
नवीन गोष्टी, कौशल्य शिकण्याची तुमची किती तयारी आहे, हे ते तपासून पाहतात. आणि काही मुलं खूप हुशार असूनही नवीन काही शिकण्याचा उत्साह नसल्यानं नाकारलीही जातात!
त्यामुळे करिअरचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे आपली नवीन कौशल्य शिकण्याची तयारी!
तुम्ही कुठलंही करिअर निवडा हे नवीन कौशल्य शिकण्याची आणि ती शिकताना स्वत:ला विकसित करण्याची सवय स्वत:ला लावून घ्या!
तरच भविष्यात करिअरच्या वाटांवर अनेक संधी तुम्हाला उभ्या दिसतील!
आता तुम्ही म्हणाल की, हे काय भलतंच?
आता तर आम्ही करिअर निवडीच्या विशिष्ट टप्प्यावर उभे आहोत. हातात आहेत त्या सर्टिफिकेट्सच्या आधारावर मला नोकरी मिळालीच पाहिजे. आता पुढे शिकायला पूर्णविराम. शिक्षण संपलं. आता फक्त नोकरी!
हे असे विचार वेळीच मनातून काढून टाका, कारण उत्तम करिअरच्या वाटेवर ही अवस्था कधीच येणार नाही! कारण असं थांबलात तर करिअर थांबेल.
शिकणं चालूच ठेवा.
हे शिकण्याचं सॉफ्टवेअर कम्प्युटरमध्ये नको, तर स्वत:च्या मेंदूत घालता यायला हवं म्हणजे त्याचा योग्य वेळी, योग्य त्या कारणासाठी तुम्हालाच उपयोग करता येईल. हेही लक्षात घ्या की, कोणत्याही कंपनीमध्ये नवं शिकायला उत्सुक असणारी माणसं हवी असतात. शिकणं चालू असणं हेच प्रगतीचं मोठं लक्षण आहे.
पण हे शिकणं चालूच कसं ठेवायचं?
नवीन स्किल्स शिकायचे कसे?
1. नोकरीशी संबंधित वर्तमानपत्रं, पाक्षिकं तुम्ही वाचत असालच. वाचत नसाल तर आवर्जून वाचा. त्यातून आपल्या आसपास नक्की काय चाललं आहे, हे कळतं. सध्या कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची, कोर्सेसची चलती आहे हे कळतं. नक्की कोणत्या विषयातले तज्ज्ञ हवे आहेत, भविष्यात हवे असतील, कुठं पुढच्या पाच वर्षात जास्त संधी आहेत हे कळतं. त्यामुळे आपण काय शिकायचं आहे याची माहिती होते.
2. या मािसकांच्या, वर्तमानपत्रंच्या बरोबरीनं आर्थिक विषयातले लेख, सदरं वाचा. त्यातूनही शिकण्यासारखं खूप काही असतं. याच विषयांवर टीव्हीवर बिझनेस संदर्भातले कार्यक्र म असतात. गुंतवणुकीसंदर्भातल्या चर्चा, त्यांचे अनुभव ऐकायला मिळतात. यातून तुमच्या एकूण ज्ञानात बरीच भर पडेल. आर्थिक साक्षरता येईल. असं म्हणतात की, महाराष्ट्रातल्या युवकाला या विषयांचं फारसं ज्ञान नसतं. पण या बाबतीत तुम्ही मागे पडू नका. कदाचित तुम्हाला या विषयात रस नसेलही पण माहिती पाहिजेच.
3. महिन्याला कोणतंही एखाद्या प्रसिद्ध, कर्तबगार व्यक्तीचं चरित्र किंवा आत्मचरित्र वाचा. तुम्हाला जे क्षेत्र आवडतं त्या व्यक्तीचं चरित्र किंवा आत्मचरित्र मिळालं तर चांगलंच. इतरांच्या लेखनातून, त्यांना आयुष्यात कशा आणि कोणत्या अडचणी आल्या, त्या अडचणींतून त्यांनी कसा मार्ग काढला, ध्येय कसं ठरवलं, एखादं ध्येय माणसं कशी ठरवतात, त्या ध्येयासाठी कशी कामं करतात, हे आपल्याला यातून वाचायला मिळतं. अडचणी प्रत्येकालाच असतात. वाटेवर सतत असतात. या अडचणी बाजूला सारायच्या तर प्रखर आत्मविश्वास लागतो. कितीही वेळा पडलं तरी पुन्हा पुन्हा उठण्याची ताकद लागते. अशा गोष्टी आपल्याला चरित्र-आत्मचरित्रतून समजतात.
4. आयुष्यभर शिकत राहणं चांगलंच; मात्र त्यासाठी स्वत:ला प्रेरित करावं लागतं. अभ्यासासाठी गट बनवले तर जास्तच चांगलं. इतरांमुळेही आपला शिकण्यातला रस टिकून राहतो. त्यामुळे अशा सतत शिकत राहणा:या मित्रंच्या संपर्कात राहा. म्हणजे तुमची शिकण्याची इच्छा कायम राहीन.
5. इ-लर्निंगच्या माध्यमातूनही शिकता येईल. विद्यापीठांमध्येही विशेष कोर्सेस असतात, त्यातूनही आपलं शिकणं चालू ठेवता येतं. अशा कोर्सेसना अॅडमिशन घ्या. जो विषय आवडतो त्याचं शिक्षण थांबवू नका.
6. प्रत्येक क्षेत्रत आपलं ज्ञान अद्ययावत ठेवावंच लागतं. त्या क्षेत्रत नवीन काय आहे, त्यासाठी तांत्रिक स्किल्स कुठली लागतात हे माहिती करून ती शिकण्याचा प्रयत्न करा.
7. डिग्रीच्या सर्टिफिकेट्सवर समाधान न मानता, न थांबता स्वत:चं दिसणं, प्रेङोण्टेशन, बोलण्याची ढब, कम्प्युटर वापरण्याची नवीन हातोटी, इंग्रजीसह अन्य भाषांचं ज्ञान हे सारं शिकत राहावंच लागतं. ते शिकत राहा. नवीनवी सॉफ्टवेअर्स मेंदूत अपलोड करत चला. यातून करिअरला योग्य दिशा नक्कीच सापडेल.
शिकण्याचं क्रेंद्र सुरूच.
आपण अगदी लहानपणापासून शिकतच असतो. प्रौढ मेंदूमध्ये सुमारे 1क्क् अब्ज न्यूरॉन असतात. गर्भावस्थेत हे न्यूरॉन्स तयार होतात. एक न्यूरॉन हा सुमारे 5क्क्क् न्यूरॉन्सशी जोडलेला असतो. नवीन गोष्टी शिकतो तसतशी या न्यूरॉन्सची जुळण्याची प्रक्रि या होत राहते. अशा प्रकारे मेंदूचं हार्डवेअर होतं. आता त्यात तुम्ही सॉफ्टवेअर काय घालता हे तुमच्यावर अवलंबून आहे.
आपल्या मेंदूमध्ये डॅन्ड्राइट्स आणि सिनॅप्सेसचं जाळं तयार होतं. आपण ठरवलं तर प्रत्येक माणसाकडून आपण काही ना काही नक्की शिकू शकतो. आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत न्यूरॉन्स शिकण्याचं काम करत राहतात. संशोधनं असं सांगतात की, आपली शिकण्याची क्षमता एवढी अफाट आहे की केवळ ठरवण्याचा अवकाश आपण केव्हाही एखादं नवीन आव्हान घेऊ शकतो. आपल्या मेंदूतली ताकद कायम वाढवू शकतो.
डॉ. श्रुती पानसे
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
drshrutipanse@gmail.com