समींदरा सावंत-हर्डीकर, मानसोपचारतज्ज्ञ -
तोंड उघडलं की विचका?
संवाद कौशल्य नाही, कम्युनिकेशन स्किल वाढवायला पाहिजे. जरा नीट बोलायला शिक, नाही तर काही खरं नाही तुझं.
ही अशी वाक्य तुम्ही येता-जाता ऐकत असाल. ‘मुलगा हुशार होता, पण कम्युनिकेशन स्किल फार विक’ असं कुणी तरी तुमच्याविषयी एखाद्या मुलाखतीनंतर म्हटल्याचंही तुमच्या कानावर आलं असेल. आणि मग प्रश्न पडला असेल की, संवाद वाढवायचा तर ते कौशल्य शिकायचं म्हणजे नक्की काय करायचं?
खरं सांगायचं तर ना, हे संवाद कौशल्य हाच सॉफ्ट स्किल्स या विषयाचा पाया आहे. त्यामागचं कारणही अगदी सोपं आहे. इतरांशी आपण संपर्क साधतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येणारी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण तोंड उघडल्यावर बोलतो काय आणि कसं? आपल्यातील इतर गुण-दोषांची तोंड ओळखनंतर होवो अगर नाही, आपण एकदा तोंड उघडून बोललो की, समोरचा माणूस आपली परीक्षा करतोच.
त्यामुळे संवाद कौशल्य म्हणजे फक्त उत्तम बोलता येणं नव्हे, तर ते प्रत्येक व्यक्तीनुसार योग्य पद्धतीनं बोलता येणं. आजच्या व्यावसायिक जगात तर फोन, ई-मेल, एसएमएस, व्हॉट्स अँप, स्काइप याद्वारे संवाद साधला जातो. म्हणजे तिथं तर तोंड न उघडताही आपल्याला बोलायचंच असतं.
हे सारं इतकं सोपं कसं असेल? हे कौशल्य शिकणं ही एक जन्मभर चालणारी प्रक्रियाच आहे. एक प्रवास आहे आपणच आपल्यासोबत केलेला. त्या प्रवासाच्या सुरुवातीला काही गोष्टी सोबत हव्यात, त्या वस्तूंची ही एक यादी तेवढी लक्षात ठेवा.
शब्द-शब्द जमवा.
जगभरात इंग्रजी ही व्यवसाय क्षेत्रातील अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली गेली आहे. ती भाषा आपल्याला यायला हवी. ती येत नाही ही नव्या जगात अनेकांची पहिली अडचण. न घाबरता लहान मुल शिकतं तसं एकेक शब्द बोलत भाषा आपली आपण शिकायला लागायची. गाणी ऐका, सिनेमे पहा. ही तर सोपी साधनं आहेतच हाताशी. शब्द कानावर पडत राहिले की, बोलताना ते आपसून सापडतात.
ऐकून तर घ्याल?
संवादात जितकं बोलणं महत्त्वाचं तितकंच ऐकणंही. त्यामुळं बोलायची घाई करू नका. आधी समोरच्याचं ऐका. जास्त ऐका. कमी, विचारपूर्वक, योग्य, स्पष्ट आणि नजरेत नजर घालून बोला. मात्र बोलण्याच्या क्षमतेइतकी आपली ऐकण्याची क्षमता वाढवणंही अत्यंत महत्त्वाचं!
बॉडी लॅँग्वेज जास्त बोलकी. देहबोली आपल्या नकळत बरंच काही समोरच्याला सांगून जाते, आपलं पोश्चर कसंय? आपण बोलताना आणि ऐकताना नजरेत पाहतो की टाळतो, आपल्या चेहर्यावर कंटाळा दिसतो का, हे आपलं आपण तपासून पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी.
जीके हवंच हाताशी
शोऑफ करू नये, जीकेवर वेळ मारूनही नेऊ नये. पण चारचौघात एखादा विषय सुरू असेल आणि आपल्याला बोलावंच लागलं तर निदान संभाषण करण्यापुरतं तरी आपल्याकडे जनरल नॉलेज हवंच. अनेकदा या जीकेवरच आपण चार लोकांशी बोलून ओळखी करून घेऊ शकतो.