तुम्ही शॉपिंगला जाताना मनात काय ठरवता? म्हणजे कसं प्लॅन करता की, आपल्याला काय घ्यायचंय? तुम्ही म्हणाल त्यात काय प्लॅन करायचंय? सरळ मॉलमध्ये जायचं, जे काय ट्रेण्डी दिसेल, स्मार्ट वाटेल ते उचलून आणायचं. ( बजेट पहावं लागतं, बाकी काही नाही.)
कपड्यांचं शॉपिंग बहुतेक जण असंच करतात.
आपल्या मित्रमैत्रिणीनं जे घेतलंय ते तरी घेतात किंवा आपण कुठे तरी पाहिलेलं, फॅशनमध्ये असलेलं, कुठल्या तरी मासिकात, टीव्ही शोमध्ये बघितलेलं असं काहीतरी दुकानातून, मॉलमधून घेऊन येतात.
फार्फार तर खरेदी करताना त्यांच्या डोक्यात एकच विचार असतो की, अमुक एक रंग आपल्याला चांगला दिसत नाही. एकतर ते मत त्यांन स्वत: तरी ठरवलेलं असतं किंवा त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणींनी तरी सांगितलेलं असतं. पण त्यापलीकडे रंगांचा काही विचारच कुणी करत नाही. ना रंगांचा विचार केला जातो ना, फॅब्रिकचा, ना कट्सचा ना ते कपडे आपल्याला शोभतील की नाही याचा.
खरंतर मॉलमध्ये जाताना बजेटइतकंच महत्त्व किंवा त्याहूनही जास्त महत्त्व या सगळ्या गोष्टींना आहे.
पण आपण ते सारं काही समजून घेतच नाही. मात्र फॅशन म्हणून नाही तरी बदलत्या काळाची, प्रेझेंटेबल असण्याची गरज म्हणून तरी आता सगळ्यांनीच या गोष्टी समजून घ्यायची गरज आहे. नव्या कॉर्पोरेट जगात काम करताना, नव्या लाइफस्टाइलमधे आपलं ‘दिसणं’ हीदेखील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. ठरते आहे. कसंही राहिलं गबाळं, तरी चालतं असं म्हणण्याचे दिवस आता संपले. उलट आपल्या कामाला, पर्सनॅलिटीला, आपण काम करतो त्या वातावरणाला आणि आपल्या लूकला काय शोभून दिसेल याचा अत्यंत गांभीर्यानं विचार करायला हवा. ती कला शिकून-समजून घ्यायला हवी. - कला? अर्थात कला. कपडे घालणं, त्यांची योग्य निवड करणं ही एक कलाच आहे.
ती शिकली, त्यामागचं सूत्र समजून घेतलं. तर आपणही आपला लूक बदलू शकतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम देऊ शकतो. आणि आपलं म्हणून एक खास इम्प्रेशनही जमवू शकतो.
स्टाइल स्टेटमेण्ट याहून वेगळं ते काय असतं.?
ते कसं करायचं हेच सांगणारा एक प्रवास या अंकापासून सुरू करतोय.
‘स्टायलिस्ट’ म्हणून मला असं नेहमी वाटतं की, प्रत्येकानंच आपल्याला ‘दिसण्याचा’ खास विचार करायला हवा. चांगलं दिसणं, टापटिप राहणं, आपल्या राहणीमानात सुधारणा करणं ही या काळाची गरज आहे.
ती आपण आपल्यापुरती तरी भागवू शकतो.
सो, लेट्स स्टार्ट. आपण बोलू. स्टाइल्सविषयी, कपड्यांविषयी आणि त्याकडे पाहण्याच्या एका खास दृष्टीविषयी.
- प्राची खाडे (स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर)