नऊवारीच्या काठाच्या पॅण्ट आणि कुर्ता मराठमोळ्या रंगाची नवी फॅशन
महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये वेशभूषेचे विशेष महत्त्व आहे. पूर्वीच्या काळात स्त्रिया नऊवारी साड्या, गळ्यात चिंचपेटी, केसांचा तयार केलेला खोपा, नथ, बाजूबंद सर्रास घालत असत. कालांतराने आधुनिक जगात या गोष्टी मागे पडत गेल्या. नऊवारी साडीतून पाचवारी साड्या ते थेट जीन्स, टॉप, स्कर्ट आणि वनपिस ड्रेसपर्यंत वेशभूषेचा प्रवास झाला आहे. मात्र आता प्रत्येक सण, उत्सव, समारंभात पूर्वीची ही मराठमोळी फॅशन पुन्हा येत आहे.
पैठण्या, नऊवारी साड्या लग्न समारंभात, मराठी सणांच्या दिवशी घालणं हे हल्ली तरुणींना फार आवडायला लागलं आहे. मात्र प्रत्येकीलाच नऊवारी साडी नेसायला जमत नाही. म्हणून मग त्या रेडिमेड शिवलेल्या नऊवारी साड्या वापरू लागल्या आहेत. त्यातही काही हटके प्रयोग केले जातात. आम्ही आमच्या कलेक्शनमध्ये नऊवारीचा काठ घेऊन त्याप्रमाणे पॅण्ट तयार केल्या आहेत. या नऊवारीचे काठ असलेल्या पॅण्टवर लॉँग कुर्ता, शॉर्ट टॉप काहीही सूट करते. या प्रकारच्या फ्यूजन पॅण्ट्सना हल्ली मागणी जास्त आहे. त्यामुळे झटपट तयार होऊन मराठी पारंपरिक वेशभूषेला आधुनिकतेचा साज सहज चढवता येतो. त्याशिवाय मोठ्ठं कुंकू, नाकात नथ, पायात कोल्हापुरी चपला, पारंपरिक लाल, निळा, हिरवा रंगांच्या नऊवारी साड्या हे सारं पुन्हा अनेक तरुणींना मनापासून आवडू लागलं आहे.
त्यातलं सौंदर्य पुन्हा खुणावू लागलं आहे.
- वैशाली शडांगुळे
सुप्रसिद्ध डिझायनर