शिवसाई मंडळ, वडगणे,
जि. कोल्हापूर
कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले सुमारे आठ हजार लोकसंख्येचे वडणगे हे गाव. याच गावातील शिवाजी गल्लीमधील ३0 तरुणांनी एकत्र येऊन शिवसाई कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली. सगळेजण साजरा करतात तसाच गणेशोत्सव साजरा करायचा असंच सुरूवातीला त्यांच्या डोक्यात होतं. सुरुवात केली तेव्हा मंडळाची पहिली गणेशमूर्ती अवघ्या पाच रुपयांची होती. मात्र दरवर्षी वर्गणीची रक्कम वाढत राहिली तसा त्या पैशाचा सदुपयोगच व्हायला हवा असं या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं.
गणपतीत सर्वत्रच होणार्या नेहमीच्याच हौशी स्पर्धा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या पलीकडे जाऊन एक खास काम या मंडळानं करायचं ठरवलं. आठ वर्षांपूर्वी त्यांनी ‘विद्यार्थी दत्तक योजना’ सुरू केली. गावातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या पाचवीपासून बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च मंडळानं करायचं ठरवलं. या योजनेनुसार मंडळ दरवर्षी दोन विद्यार्थी दत्तक घेतं. त्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश, शालेय साहित्य देण्यात येतंच पण त्यांची प्रवेश फी, परीक्षाशुल्क यासाठीचे पैसेही मंडळच देतं. गणेशोत्सवासाठी जमलेल्या वर्गणीतून ठराविक रक्कम त्यासाठी बाजूला काढली जाते. आतापर्यंत ११ विद्यार्थ्यांना मंडळाने मदत केली आहे. त्यातील काहीजण शिक्षक, अभियंता बनले असून, काही नोकरी, व्यवसायात कार्यरत आहेत.
मंडळाचे माजी अध्यक्ष महादेव नरके सांगतात, ‘२0१५ मध्ये आमचे मंडळ रौप्यमहोत्सवी वर्षात पर्दापण करत आहे. त्यानिमित्त विद्यार्थी दत्तक योजनेची व्याप्ती आम्ही वाढवायचे ठरवतोय. दरवर्षी किमान दहा विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, मुख्य म्हणजे एक कायम स्वरूपी विद्यार्थी दत्तक फंड उभारायचेही ठरवतोय!
- संतोष मिठारी