नोव्हेंबर उजाडला..
थंडी येवो ना येवो,
तिची चर्चा वाजतगाजत सुरु होतेच.
दिवाळीनंतर कॉलेज सुरू होतं आणि या काळात स्वेटर्स घालून स्टायलिश होत मिरवणं हे एकदम ट्रेण्डी असतं. त्यामुळे अनेकजण एकदम जागे होतात आणि गरम कपडे खरेदी करायला जातात.
तुमचंही असंच काही प्लॅनिंग असेल तर सध्या ट्रेण्डी काय याची एक लिस्ट आपल्या हाती असलेली बरी..
तेच घ्या असं नाही, पण घ्यायचंच असेल तर जरा स्टायलिश विण्टर वेअर घ्या...
तर सध्या काय आहे चर्चेत?
१) ढगळं स्वेटर
तुम्ही म्हणाल काहीही काय? ढगळं स्वेटर कसं असेल ट्रेण्डी? पण ते असतं. आहे. ओव्हरसाईज्ड स्वेटर ही तशी वेस्टर्न स्टाईल. त्यामुळे आपली ‘फिगर’ काही जाडजूड दिसत नाही. उलट लपतेच. आणि थंडीत ही ढगळी स्वेटर्स दिसतातही छान, वेगळी. त्यामुळे घ्यायचंच असेल तर जरा मापानं मोठं स्वेटर घेतलेलं बरं. वाढत्या मापाचं.
२) लेअरिंग
काहीजण उन्हाळ्यात लेअरिंग करतात ते सोडून द्या. पण तरुणांच्या जगात सध्या जगभर फेमस असलेल्या लेअरिंगची हौस थंडीत भागवून घ्या. शर्टांवर शर्ट, जॅकेट्स असं काहीबाही लेअर देत एन्जॉय करा. डार्क आणि लाईट असं कॉम्बिनेशन मात्र करा. दोन्ही डार्क जरा हॉरिबलच दिसतं.
३) हॅट्स/टोप्या/स्ट्रोल्स
या निमित्तानं हॅट्स घालायची हौस भागवून घ्या. याशिवाय कानटोप्याही पुन्हा इन झालेल्या आहेत. आणि स्टायलिश स्ट्रोल्स, मफलरही गळ्याभोवती मिरवताहेत. घेणार असाल तर उत्तम, स्टायलिश आणि वॉर्म स्ट्रोल, टोेपी घ्या.
४) लॉँग स्वेटर्स
हे जरा खास मुलींसाठी. सध्या लॉँग स्वेटर्सची फॅशन परत आली आहे. गुडघ्यापर्यंतचे श्रग्ज, स्वेटर्स ही यंदाची जरा खास स्टायलिश गोष्ट असेल असा अंदाज आहे.
५) डेनिमचं जॅकेट
जॅकेट हे कायमच ट्रेण्डी. त्यात आता पुन्हा तेच ते निळ्या रंगाचं, बाह्यांचं, बिनबाह्यांचं जॅकेट पुन्हा हिट होतं आहे. छोटं-मोठं, लॉंग असे सगळे जॅकेट्स सध्या पुन्हा फॉर्मात आहेत.
६) शेकोटी पार्टी
ही गोष्ट विकत घेण्याची नाही. प्लॅन करण्याची आहे. दोस्तांना जमवा आणि या थंडीत एक शेकोटी पार्टी करा. गाणी गा, अंताक्षरी खेळा, गरम भजी खा, गप्पा मारा. आणि छान हेल्दी थंडी एन्जॉय करा.