- प्रवीण दाभोळकर
आषाढी एकादशीला माउलीचा दर्शन ज्यांना पंढरपूरी झालं ते नशिबवान. पण ज्यांची पंढरीला जाण्याची इच्छा अपूर्ण राहिली असे काही वारकरी, बोरीवली ते चर्चगेट लोकल वारीला निघालेले! आषाढी एकादशी निमित्त समस्त प्रवासी वारकरी वर्ग हरिनाम सप्ताह संपूर्ण करत, एक दिवसाची विशेष रजा टाकून, आपल्या पारंपरिक वेषभूषेत, टाळ, मृदुंगासोबत हरिनामाचा गजर करत आणि मनातल्या चैतन्याची अनुभूती करणारे अभंग गात, ‘विठ्ठल रु क्मिणी’ची पालखी खांद्यावर घेत, लोकलमध्ये हा सोहळा साजरा करणार आहेत.
श्री ढोकेमामा सहप्रवासी भजनी मंडळातर्फे आषाढी एकादशीच्या दिवशी होणाºया या लोकल वारीची परंपरा १९८५ पासून अविरत चालू आहे. ही परंपरा या वर्षीहीचालू ठेवत, बोरीवली ते चर्चगेट ८.५७ च्या लोकलमध्ये ‘पुंडलिक वरदा... हरी विठ्ठल!’ असा विठ्ठलनामाचा जयघोष होणार! रोज सकाळच्या चर्चगेट लोकलमध्ये हे वारकरी नियमित विठ्ठलनामाचे गुणगान गात असतात. अभंग प्रवास हाच वारकºयांचा संत परंपरेचा पाया असून, मराठी, गुजराती अशा सर्वभाषिक समाजाला आपलेसे करत बंधुत्वाची जोपासना करण्याचा प्रयत्न होतो. वारकरी संप्रदायाच्या विचारांचं प्रसारण, ट्रेनमध्ये चढणाया प्रवाशांमध्ये शिस्त आणि सुसूत्रता आणणं, भजनाचं सुरेल गायन अशा शिक्षणातून सहप्रवासी या नात्यानं एकेमकांना जवळ आणत आहेत.
मूळचा शेतकरी असलेला वारकरी शहराकडे वळलाआणि खासगी नोकरीतल्या ९ ते ६ च्या वेळेत अडकून त्याचे माहेर पंढरीपासून दुरावू लागला, पण टाळ, मृदुंग आणि अभंगाचे मूळ विसरेल तो वारकरी कसला? मग तो दैनंदिन लोकलच्या प्रवासात ही आपली पिढीजात परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करू लागला. मुंबईची रक्तवाहिनी असलेल्या लोकलमधून असे असंख्य वारकरी सकाळ-संध्याकाळी अभंगाच्या स्वरातून सहप्रवासी म्हणून आपल्या कानावर पडतात. शिपिंग कंपनीत सहायक महाप्रबंधक असलेले मंडळाचे संचालक वसंत प्रभू, आपल्या सहकाºयांसमवेत गेली २५ वर्षे ही धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. सर्वांच्या भावनांचा आदर करत, विठ्ठलभक्तीशी प्रामाणिक राहण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे प्रभू सांगतात.