सरसरत आठवणीची सर माझ्या अंतर्मनात शिरते आणि चिंबाड भिजवते. ‘तिच्या’ सहवासातला पाऊस मग माझ्या मनावर बरसतच राहतो. अशाच एका पावसात ‘ती’ भेटली.
अकोल्याच्या बसस्थानकातून मी आपली छत्री उघडून बाहेर पडलो. साधारण सकाळी साडेनऊची वेळ असावी. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. गांधी चौकात जात असताना रस्त्यात ती दिसली. माझ्याच वयाची असेल. म्हणजे मी तेव्हा एकोणीस-वीस वर्षाच्या आसपास असेन. सळसळतं तारुण्यच म्हणा ना !
ग्रामीण भागाचा टच असणारं राहणीमान पण एकूणच मनाला मोहवणारं तिचं रूप पाहून श्रावणात जोरदार सर यावी आणि लख्खं ऊन पडावं तसंच झालं. कारण रस्त्यावरची इतर इतकी माणसं सोडून तिनं मलाच पत्ता विचारावा, असं माझ्यात काय होतं?
मी छत्री सावरत चाललो होतो, माझ्याच तंद्रीत. ती मात्र इमारतीच्या आडोशाला जणू माझी वाटच पाहत असावी. एकदम म्हणाली,
‘शिवाजी कॉलेज किती लांब आहे येथून?’ मी पटकन बोलून गेलो.
‘तुला शिवाजी कॉलेजमध्ये जायचंय?’
‘हो.. तिथे मला अँडमिशन घ्यायची आहे.. पण पाऊस, छत्रीही नाहीये. रिक्षाही मिळत नाहीये.
(म्हणजे परवडणार नाहीये असाच टोन).’
मी भीतभीतच म्हणालो,
‘मी त्याच बाजूनं चाललो आहे. माझं कॉलेज त्याच रस्त्यावर आहे. यायचं असेल तर.?’
कुठलीही ओळख नाही. रस्त्यावर भर पावसात एखादी मुलगी भेटावी, बोलावी हा धक्का पचत नव्हताच, त्यात आपण तिला आपल्या छत्रीतून ये म्हणायची हिंमत करावी अजून काय हवं?
तिनं मला वरून खालपर्यंत न्याहाळलं. तिला माझ्याबद्दल विश्वास वाटला असावा कदाचित. ती म्हणाली,
‘मग तर बरंच होईल. उगीच पुन्हा चुकायला नको. थेट कॉलेजपर्यंत सोडाल?’
‘हो चला ना’
असं म्हणताच ती माझ्या छत्रीत येऊन माझ्यासोबत चालायला लागली. श्रावणातला पाऊस अधूनमधून बरसत होता. एकाच छत्रीत आम्ही रस्त्यानं चालत गप्पा मारत जात होतो. एकमेकांची नावं विचारून झाली. ती खूपच समजदार वाटली. त्याचमुळे मी तिला चहा प्यायचा का असं विचारण्याची हिंमतही केली. टपरीवर आम्ही दोघांनी चहा घेतला. तिनंही जुन्या मित्राशी बोलावं त्या विश्वासानं गप्पा मारल्या. चालता रस्ता केव्हा संपला आणि तिचं कॉलेज केव्हा आलं हे कळलंसुद्धा नाही..
पाऊस काही थांबला नव्हता, पण ती गेली.
त्यानंतर आम्ही कधीही भेटलो नाही. ती पुन्हा कधी दिसली नाही.
पण पाऊस आला की ती आठवते.पहिली आणि शेवटचीच पाऊसभेट.
- मोहन शिरसाट