- सूरज राऊत
‘दोन व्यक्तींचं लग्न होण्यासाठी प्राथमिक अट कोणती?’- मी नववीला असताना नागरिकशास्नच्या तासाला सरांनी वर्गाला हा प्रश्न एकदा केला होता. त्यावर मी अतिउत्साहाने हात वर करून उत्तर द्यायला सरसावलो. ‘त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असायला हवं. त्यांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं’. असं मी म्हणालो. सरांनी मला शांतपणे खाली बसायला सांगितलं. ‘त्या दोन व्यक्ती स्री आणि पुरु ष असायला हवेत. ’ सरांनी ‘योग्य’ उत्तर सांगितलं. वर्गात एकच हशा पिकला आणि मीदेखील हे इतकं साधं-सोपं उत्तर आपल्याला कसं आलं नाही म्हणून वरमून गुमान खाली बसलो. आज अनेक वर्षांनी कळतंय की ते उत्तर इतकं साधं आणि सोपं, योग्य आणि अयोग्य या बायनरीमध्ये मोडणारं नव्हतंच मुळी. ही घटना आज आठवायचं कारण म्हणजे सोमवारच्या सायंकाळी येऊन धडकलेली एक बातमी. हिंदू समलैंगिक विवाह कायदेशीर नोंदविले जावेत या संदर्भातील दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर केंद्र सरकारने अपेक्षेप्रमाणेच आपली कर्मठ, होमोफोबिक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. ‘भारतीय हिंदू संस्कृती, विवाहविषयक कायदे आणि सामाजिक मूल्ये अशा लग्नांना मान्यता देत नाहीत.’ असं त्यांचं मत.कोण ठरवतं मूल्य, संस्कृती आणि सामाजिकतेच्या या व्याख्या? या व्याख्यांचं स्वरूप हे नेहमीच समलिंगी व्यक्तींच्या हक्कांची गळचेपी करणारंच का असतं?
इकडे आड, तिकडे विहीर अशी ही परिस्थिती आहे.
* केंद्र सरकारची बाजू मांडणारे वकील कोर्टात म्हणाले, की समलैंगिक लग्नांना मान्यता द्यायची झाली तर त्यातली स्री कोण आणि पुरुष कोण हे ठरवणं क्र मप्राप्त ठरेल. * पण म्हणजे पाहा, ही मानसिकताच या लग्नांमधला मोठा अडसर आहे. लग्नाच्या आड येणारे जात, धर्म, प्रांत, भाषा हे अडसर हळूहळू आपण बाजूला सारू पाहतो आहोत तर मग लिंग आणि लैंगिकता हेही घटक बाजूला सारू.* लग्न हे निव्वळ स्री आणि पुरुष यांच्यातच होऊ शकतं हे वर्षानुवर्षे आपल्यावर बिंबवण्यात आलेलं कंडिशनिंग थोडं अनलर्न करायचा प्रयत्न करू. हीच शिकवण आपल्यावर थोपवू पाहणार्या शाळेतल्या सरांना, आपल्यावर हसणार्या वर्गमित्रांना आत्मविश्वासाने सामोरं जाऊ.* त्यांना जाणीव करून देऊ की लग्न हे एकमेकांवर प्रेम करणार्या कुठल्याही, अगदी कुठल्याही दोन सज्ञान व्यक्तींमध्ये शक्य आहे. * कायद्याचे दरवाजे आमच्यासाठी उघडत आहेतच; पण संस्कृती आणि (गैर)समजुतींनी टाळेबंद असलेल्या मनाची दारं पण किलकिली करू. एलजिबिटी समुदायाच्या सर्वसमावेशक सामाजिक स्वीकार्यतेकडे जाणारं ते पहिलं पाऊल आहे.
(MIST ही संस्था एलजिबिटी समुदायाच्या हक्कांसाठी, जनजागृती करते, त्या संस्थेत सूरज ऑपरेशन्स हेड म्हणून कार्यरत आहे.)