शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

प्रार्थना

By admin | Updated: June 23, 2016 16:40 IST

दुखापतींशी लढली, जिद्दीनं कोर्टवर टिकून राहिली, मेहनतीत मागे राहिली नाही, म्हणून ती आता ‘जिंकण्याचं’ स्वप्न घेऊन एक मोठी झेप घेते आहे..

‘मुलगी म्हटलं की, नटणं, सजणं, फॅशन हे सगळं आलंच ! पण ती मात्र त्यात रमली नाही, गुंतली नाही आणि तिला त्याचं कधी आकर्षणही वाटलं नाही. साध्या लिपस्टिकचंही तिला कधी आकर्षण वाटलं नाही. पहाटे उठायचं आणि टेनिस कोर्टची वाट धरायची... डिसिप्लिण्ड किड ! बरं, जे जे सहवासात येतील त्यांना जीव लावायचा, त्यामुळे गावची मैत्रीण असो अथवा मेरी कोम, बिंद्रा आणि सानियासारखे दिग्गज खेळाडू असोत, सारे तिच्याशी जोडलेले राहतात...’- प्रार्थना ठोंबरेच्या आई वर्षा भरभरून बोलत होत्या. त्यांच्या प्रत्येक शब्दात आपल्या मुलीविषयी कौतुक आणि आनंद ठासून भरलेला होता. रिओ आॅलिम्पिकसाठी भारताचं प्रतिनिधित्व आपली लाडकी लेक करणार याचा आनंद आईसाठी सर्वोच्चच ! प्रार्थनाची आई वर्षा, वडील गुलाबराव ठोंबरे-झाडबुके यांच्याशी बोलताना त्याचा अनुभव येत होता. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे गाव शाहीर अमर शेखांबरोबरच एका जमान्यात सुलाखे, झाडबुके या घराण्यांच्या नावाने ओळखलं जायचं. ज्वारी आणि डाळ मिल्ससाठीदेखील बार्शी ओळखली जायची. देशात भगवंताचे एकमेव मंदिर असलेले गाव म्हणून भगवंताची बार्शी ! आता या गावाला नवी ओळख लाभलीय. आॅलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या टेनिस क्वीन सानिया मिर्झाची पार्टनर प्रार्थना ठोंबरेची बार्शी !टेनिससारख्या ‘हाय प्रोफाईल’ खेळात बार्शीची मुलगी कशी चमकली? या प्रश्नाच्या उत्तराची सर्वांनाच जिज्ञासा. बार्शी ते रिओ हा प्रार्थनाचा प्रवास कसा झाला? बार्शीतील नामवंत झाडबुके घराणं हे प्रार्थनाचं आजोळ ! माजी नगराध्यक्ष स्व. भाऊसाहेब झाडबुके व माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांची ती नात. तिची आई वर्षा व वडील गुलाबराव ठोंबरे. अभियंता असलेले गुलाबराव शासकीय सेवेत होते. त्यांनी प्रार्थनाच्या टेनिस करिअरसाठी पाच वर्षांपूर्वी नोकरी सोडली आणि आपला सारा वेळ ते प्रार्थनाला घडविण्यासाठी देऊ लागले. प्रार्थनाचे चुलत आजोबा आप्पासाहेब झाडबुके हे टेनिसचे चांगले खेळाडू. बार्शीत असलेल्या एकमेव टेनिस कोर्टवर ते आणि त्यांचे काही मित्र खेळायचे. त्यांची मुलं अनिल, सुनील, जगदीश तसेच सध्या महाराष्ट्राचे क्रीडा संचालक असलेले नरेंद्र सोपल, प्रा. रमेश आजरी यांनीही आप्पासाहेबांचीच प्रेरणा व मार्गदर्शन घेऊन आपलं टेनिसमधील प्रावीण्य विकसित केलं. पुढे आप्पासाहेबांची नातवंडं आजोबांसोबत खेळायला जाऊ लागली. त्यांच्यासोबत प्रार्थनाच्या मातोश्री वर्षा यांनी तिलाही खेळायला पाठवायला सुरुवात केली. बार्शीच्या कोर्टवर प्रार्थनाची धडपड सुरू असताना तिची आई व वडील गुलाबराव यांनी तिला सोलापूरला खेळण्यासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. दररोज ७० किलोमीटरचा बार्शी-सोलापूर प्रवास करून चिमुकली प्रार्थना रॅकेट घेऊन टेनिस कोर्टवर उतरायची. तिथल्या सगळ्या मुलींना हरवायची ! तिची ही चमक सगळ्यांच्याच नजरेत भरू लागली. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला सर्व स्पर्धांमध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी ती महाराष्ट्रात नंबर १ ची खेळाडू बनली. तिची ही प्रगती पाहून तिला सोलापुरात ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सोलापुरातील प्रशिक्षक राजीव देसाई, सुधीर सालगुडे यांनी तिच्या खेळावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. सोलापुरातील जाम मिलपासून क्रीडा संकुलापर्यंत दररोज ती धावत जायची. फिटनेस आणि तंत्रासाठी जे जे करावं लागतं ते काटेकोरपणे करायची. हे परिश्रम चालू असतानाच माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर नलिनी चंदेले, लोकमंगल उद्योगसमूहाचे सरव्यवस्थापक रविकांत पाटील यांच्या कुटुंबातील मुलींशीही तिची गट्टी जमली होती. तिचा खेळ जसा बहरू लागला तसे तिच्या आई-वडिलांनाही करिअर म्हणून तिनं टेनिसची निवड करावी, असं वाटू लागले. त्यासाठी त्यांनी तिला पुण्याला ठेवण्याचा निर्णय घेतला. वयाच्या दहाव्या वर्षी प्रार्थनानं १४ वर्षांखालील मुलींची राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. पुढे तिने १६ वर्षांखालील, १८ वर्षांखालील आणि २१ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धाही जिंकल्या. २००८ हे तिच्या जीवनातील सर्वोच्च उदयाचं साल ठरलं. त्यावर्षी तिला ज्युनिअर गटातील आशियातील टॉप प्लेअर ठरण्याचा मान मिळाला. टेनिस क्वीन सानिया मिर्झा ही प्रार्थनाची आदर्श ! दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सानियाचीच पार्टनर म्हणून खेळण्याची संधी मिळाल्यानं तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्या स्पर्धेतही सानियासोबत खेळून तिनं भारतासाठी ब्राँझपदक मिळविलं. अल्पावधीतच ती सानियाचीही आवडती खेळाडू आणि मैत्रीण बनली. सानियाच तिची खाण्या-पिण्यापासून खेळातील बदलापर्यंतची काळजी घेऊ लागली. म्हणून मग प्रार्थनाच्या आई-वडिलांनी तिला हैदराबादच्या सानिया मिर्झा टेनिस अकादमीत ठेवण्याचा निर्णय घेतला. तिथे तिला सानियाचे वडील इम्रान मिर्झा हे गुरू म्हणून लाभले. त्यांनी प्रार्थनाच्या खेळातील त्रुटी दूर करत तिला अनेक युक्त्या सुचवल्या. त्यांनीच तिच्या खेळातील बचावात्मक शैलीचं आक्रमक शैलीत रूपांतर केलं. तिची जिद्द, परिश्रम आणि मिर्झांच्या मार्गदर्शनामुळे २०१५ या वर्षात तिनं ११ टायटल्स जिंकले. बार्शीच्या टेनिस कोर्टवरून सैराट सुटलेली प्रार्थना आता रिओचं टेनिस कोर्ट गाजवायला सज्ज झाली आहे!..आणि त्यानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेतही मैदान गाजविण्याचं तिचं स्वप्न आहे. मुक्त विद्यापीठातून पदवीखेळाचा खडतर प्रवास चालू असतानाच प्रार्थनाने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी संपादन केली आहे.गुणवत्तेची अशीही तपासणीराज्यात पहिल्या क्रमांकावर आल्यानंतर प्रार्थना आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊ शकते का? या प्रश्नाची उकल करण्यासाठी तिची आजी प्रभाताई झाडबुके यांनी तिच्या गुणवत्तेची व्यावसायिक तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्या तिला घेऊन कोलकाता येथे गेल्या. तेथे व्यावसायिक प्रशिक्षक गॅरिओ बॅरीयल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिने राहून तिच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यात आली.गुलाबराव, धोबी आणि आचारीही !मुलीचं करिअर घडविण्यासाठी तिच्यासोबत सावलीसारखे राहणारे वडील गुलाबराव देश-विदेशात तिच्यासाठी स्वयंपाकही शिकले आणि प्रसंगी तिचे कपडेही त्यांनी धुतले. आई वर्षा यांनी तिला पैशाची कमी भासू दिली नाही, तर वडिलांनी तासन्तास तिचा खेळ पाहून ‘बॉल टू बॉल’ अधिक-उणे सांगितलं. बहुभाषिक प्रार्थना !मराठीबरोबरच जाईल तिथली भाषा शिकण्याची आवड तिला आहे. त्यामुळे आता ती इंग्रजी, हिंदी, स्पॅनिशसारख्या भाषा बोलते.गाड्यांची आवडहाय प्रोफाइल पार्ट्या आणि बाहेरच्या जेवणापासून दूर पळणाऱ्या प्रार्थनाला वेगवेगळी घड्याळं, गॉगल्स आणि देशी-विदेशी गाड्यांचे मात्र आकर्षण आहे.प्रांजल खास मैत्रीणतिला प्रांजल नावाची लहान बहीण असून, ती सध्या दहावीत शिकते. प्रांजल ही बहिणीपेक्षाही आपली खास मैत्रीणच असल्याचं प्रार्थना आवर्जून सांगते. सोलापूरची भेळ अन् नाशिकचा हेअरकट !टेनिस खेळाडू म्हणून मिळणाऱ्या वलयाची चव प्रार्थनाने आगळ्या पद्धतीने चाखली. सोलापुरात मैत्रिणींसोबत भेळ खात असताना भेळवाल्याने तिला ‘तू प्रार्थना ठोंबरेच ना?’ असा सवाल केला. ती भेळवाल्याला ‘हो’ म्हणाली. पण तुम्ही कसे ओळखता? असे विचारले तेव्हा ज्या पेपरच्या कागदात भेळ दिली आहे त्याच्यावर तुमचा फोटो असल्याचे त्याने सांगितले. प्रार्थना अनेक महिने हा किस्सा आई-वडिलांसह सर्वांना सांगत होती.तसाच किस्सा नाशिकला हेअरकट करायला गेलेल्या दुकानी घडला. दुकानदाराने हेअरकट करताना चक्क तिचा फोटो काढला आणि ‘आमच्या दुकानी टेनिस खेळाडूही हेअरकटिंग करतात’ असे लिहून तो फोटो तेथे लावला.- राजा माने(लेखक ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत.) 

rajamane61@gmail.com