ऑनलाइन शॉपिंगचं खूळ आता तसं बहुतेकांना लागलंय. एकानं काही मागवलं की दुसरा पण ट्राय करून पाहणार!
कुठल्या वेबसाइट्स ऑनलाइन वस्तू विकतात हे साधारण आपल्याला माहिती असतं. मग आपण त्याच एका वेबसाइटवर जातो. खरेदी करतो. पण पूर्वी कसं आपण बाजारात जायचो, चार दुकानं पहायचो, भावतोल करायचो, त्यातल्या त्यात स्वस्त आणि मस्त आपण खरेदी करायचो.
आता ऑनलाइनच्या जमान्यात हे आपलं स्वातंत्र्य बादच होईल का?
तर तसं काही नाही. आपण ऑनलाइन मिळणार्या वस्तूंच्या किमतीचाही अभ्यास करूच शकतो.
त्यासाठी काही वेबसाइट्स मात्र आपल्याला माहिती पाहिजे.
१) Junglee.com
ही वेबसाइट अमेझॉनने तयार केली आहे. तुम्हाला जे काही घ्यायचं असेल त्याच्या नावानं सर्च द्या. तमाम वेबसाइट्सवरच्या किमती तुम्हाला एका क्लिकवर पहायला मिळतील. तुम्हाला जे डील आवडलं, त्या वेबसाइटवर क्किल केलं की तुम्ही त्या वेबसाइटवर रवाना होता.
२) pricedekho.com
तुम्ही इथं फक्त गॅजेट्सच्या किमती ताडून पाहू शकता. टॅबलेट, मोबाइल फोन्स, कॅमेरा यांसारख्या वस्तूंच्या किमती तुम्हाला इथं पडताळून पाहता येतात.
३) compareindia.com
नुस्ती किंमत बघून वस्तू विकत घेण्याचे दिवस आता सरले. आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधे फीचर्स कुठकुठले आहेत, हेदेखील तुम्ही पहायला हवं. अशा फीचर्सची तुलना तुम्हाला या साइटवर पहायला मिळेल.
४) Mypriceindia.com
तमाम बड्या, ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळणार्या वेबसाइट्सवरच्या वस्तूंची तुलना तुम्हाला या वेबसाइटवर पहायला मिळते. त्यामुळे यापुढे कुठलीही वस्तू विकत घेताना तुम्ही अभ्यास करून निर्णय घेऊ शकाल!
- अमृता दुर्वे