- पूजा दामले
रविवार दुपार.
जेवण झाल्यावर सगळेजण झोपले. पण त्याला झोप येणं शक्यच नव्हतं, कारण अजूनही पाऊस थांबला नव्हता. जरा खिडकी जवळ गेलो तर थंड वारा अंगावर आला. बाहेरचा पाऊस थांबला होता, पण मनातला आठवणींचा पाऊस बसरसत होता.
मन परत कॉलेज कट्ट्यावर जाऊन बसलं..
कॉलेज कॅण्टीन, कटिंग चहा, कांदा भाजी, मिसळ पाव, चायनिज आणि त्याबरोबर मित्रांची साथ.
भारी..
तिथे बसून केलेला टीपी...
बंक केलेली लेक्चर..
शिवमच्या अफेअरच्या चढउतारामुळे ग्रुपमध्ये येणारे चढउतार. त्याला समजवण्यासाठी शोधलेले पर्याय... एखाद्याला मुलगी जरा बरी वाटली तर सुरु झालेली चिडवाचिडवी. ब्रेकअपच्या विचारत असलेल्या मित्राला पुन्हा प्रेमात पाडणं आणि पुरत्या प्रेमात पडलेल्या बाहेर काढणं, हे सगळं काही इथेच शिकलो आणि सावरलो.
सगळं जग इथे अनुभवलं. आणि या सगळ्यातून वेळ काढून अभ्यास आणि दिलेल्या परीक्षा. सगळीच गंमत.
***
‘..आजचा दिवसच खराब आहे यार...’
‘ सकाळी सकाळी घरी अभ्यासावरून सुनावलंय, मग ते कमी की काय म्हणून शुभमच्या गर्लफ्रेण्डनं सकाळी राडा केला. म्हणून शुभमला समजवयला गेलो तर या भाईचं भलतंच डोकं चालतंय. काय तर म्हणे तिला जाऊ दे मी एकटा बरा. मनात आलं हो बरोबर बोलतोयस असाच कर, पण आत्ता मी अस म्हटलं आणि नंतर भाई शांत झाला की मला ऐकावं लागणार. मरो... मी आत्ता ठरवलंय मुलीच्या भानगडीत पडायचं नाही...’
जाऊ दे शुभम ला एकांत हवाय आणि मला शांतता. कॉलेजशिवाय दुसरा पर्याय नाही. बाहेर कुठे जायचं म्हंटलं तर मंथ एण्ड. घरी जावं म्हंटलं तर परत घरी पण ऐकावं लागणार. सो कॉलेज हा एकमेव पर्याय. तिथे गेल्यावर बाकी भिडू भेटणार मग त्यांच्याशी बोलावं लागेल... आत्ता काय??? बस्स एकच जागा आहे जिथे शांतता मिळू शकते. कॉलेज लायब्ररी. इथे आपल्या ओळखीचं कोणी भेटणार नाही. कारण परीक्षेला अजून वेळ आहे. असो फायनल डीसिजन झाला आणि मी लायब्ररी गाठली.
सगळीकडे शांतता. हां, हेच हवं होतं. ओळखीचं कोणी नको आणि शांतता. पंख्याखाली रिकामी असलेली जागा पाहून मी बसलो. बॅगमधून पुस्तक काढल आणि टेबलवर ठेवलं..
नीरजा समोर येऊन बसली ना राव. अरे ही कशी आणि का आली?
हाय, अभ्यास सुरु केलास का??? - नीरजा
अं नाही म्हणजे हो, तू कशी आत्ता इथे??? - मी
अरे मी दुपारी येते, रेफरन्सची बुक्स लागतात ना, पण आज मूड नाही लागत, चहा प्यायला जाऊयात का??? - नीरजा
(मन मे लड्डू फुटा) पण चेहरा शांत ठेवून मी ठिकये म्हणत उठलो...
खाली उतरलो आणि पाऊस सुरु झाला...
तिच्याकडेच छत्री होती, मग काय तिच्या छत्रीतून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. एका छत्रीतून जाताना ती भिजू नये म्हणून सुरु असलेले प्रयत्न. त्यातच तिच्या हाताचा माझ्या हाताला झालेला पहिला स्पर्श. टपरीवरील गरमागरम चहा, तिचे केस थोडेसे भिजलेले, चेहºयावर पाण्याचे थेंब, सगळं स्वप्नवत वाटलं. तिच्याकडे पाहत राहिलो.
गप्पा रंगल्या मग परत चहा मागवला. आणि शेवटी न राहवून आय लव्ह यू हे मी तिला सांगून टाकलं...
***
हे सारं आजच ‘त्याला’ पावसासोबत का आठवत असेल?
- वाचा, उद्या इथेच..