- महेश गलांडे
शेतकर्यांचं दुःख नेहमीच वर्तमानपत्रांतून जगासमोर येतं. बातम्या-लेख प्रसिद्ध होतात. कुणी कविता करतं, कुणी सिनेमातून वास्तव मांडतं. मात्र शेतकर्यांची तरुण मुलं आपल्या आजच्या जगण्याकडे कसं पाहतात. ते स्वत: कसे व्यक्त होतात आणि होतात का? आपली वेदना आपणच मांडतात का? जगाला सांगतात का आपलं सोसणं? तर एरव्ही हे सारं अवघड होतं. सारी घालमेल मनात घेऊन गावाकडचं शेती करणारं तारुण्य जगत होतं. शहरात नोकरी नाही, गावात शेती केली तर कुणी मुलगी देत नाही, शेतात पिकत नाही, पाऊस नाही, शेतमालाला भाव नाही, या सार्या कोरडय़ा भयंकर वास्तवात होरपळणारं तारुण्यही आपल्या अवतीभोवती आहेच. आता त्याच तारुण्याला सोशल मीडियानं एक नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.आणि शब्दांना दिली आहे ताकद, आपलं म्हणणं जगासमोर मांडण्याची हिंमतही. आणि ती हिंमतच जेव्हा रॅपच्या स्वरूपात पुढं येते तेव्हा..रॅप म्हणजे तसाही बंडखोर आवाज, बंड करणारे, व्यवस्थेविरोधात पेटून उठणारे शब्द. तसेच शब्द आपल्या मायमराठीत, आपल्या रोजच्या भाषेत मांडून एक मराठी रॅप घेऊन आलेला एक तरुण शेतकरी आणि त्याचं रॅप सॉँग सध्या गाजतं आहे.तो रॅपच्या माध्यमातून शेतकर्यांची पीडा मांडतो आहे. विचारतो आहे, सांगा शेती करू कशी, पोटाची खळगी भरू कशी?हे शब्दच त्याचे रॅप सॉँग आहे. हे गाणं त्यानं स्वतर् लिहिलं, कंपोज केलं अन् गायलही आहे. अजित शेळके त्याचं नाव.तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. त्यानं हे गाणं यू टय़ूबला अपलोड केलं अन् दुष्काळग्रस्त शेतकर्यांची व्यथा मांडणारं हे रॅप सोशल मीडियात खूप गाजलं. मराठी रॅपची चर्चाही झाली. खरं तर रॅप साँग किंवा हिपहॉपचं याड लागलेली मोठी तरुणाई देशात आहे, त्यात कॉलेजमधील मुख्यत्वे इंजिनिअरिंगच्या तरुणाईची संख्या जास्त. पाश्चिमात्य संगीताला देशी शब्दात सजवण्याचा अन् वाजवण्याचा हा प्रकार सध्या तरुणाईच्या आवडीचा बनला आहे. म्हणूनच हनी सिंग तरुणाईचा आवडता रॅपर आहे. कमी कपडय़ातल्या मुली, फोर-व्हीलर, हातात एखादा पेग, माइक, डोक्यावरील केसांची वेडी-वाकडी हेअरस्टाइल यासह न कळणार्या अर्थाचं गाणं म्हणजे रॅप साँग असंही अनेकांना वाटतं. त्यात आला अपना टाइम आएगा असं म्हणत गलीबॉयच्या मुराद. त्यानं खरं तर रॅपची ही ऐशोआरामाची ओळख पुसून टाकली. आणि आता हा बार्शीचा इंजिनिअरही न झालेला तरुण पोरगा अजित शेती करणार्या हातांची वेदना रॅपमध्ये गुंफून घेऊन आला आहे. त्याचे शब्द काळीज चिरत जातात. भाल्यासारखे ते प्रश्न वास्तवाला आरपार छेद देतात. म्हणून तर अजितच्या या रॅपला नेटिझन्सने डोक्यावर घेतलंय. अंगावर काटा आणणारा रॅप, काळजाला भिडणारं गाणं, भावा डोळ्यात पाणी आणलंस रे अशा कमेंट्स अनेक तरुण मुलं त्याच्या गाण्यावर देत आहेत. सोशल मीडियाच्या वतरुळात आणि त्यातही तरुणांच्या रॅपच्या जगात हे मराठी रॅप आणि त्यातले जळजळीत वास्तव हे सारं नवीन आहे. सोशल मीडियाला माध्यम म्हणून वापरत आपल्या शब्दांनाच अस्र बनवण्याचा हा अजितसारख्या तरुणांचा प्रयोग म्हणून नोंद घेण्यासारखा आहे.
***
कोण आहे अजित?
अजित शेळके हा उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील शेळके धानुरा या गावचा. 2 ते 3 हजार लोकसंख्या असलेलं गाव. आई-वडील गावाकडंच शेती करतात, पोरानं शिकून इंजिनिअर व्हावं म्हणून त्याला बार्शीला पाठवलं. बार्शीतील बीआयटी महाविद्यालयात अजित मॅकेनिकल इंजिनिअरिंग करतोय. पण, गाणं, आणि लिखाणाची आवड त्याला नेहमीच माध्यम क्षेत्नाकडं खुणावते. त्यातून, तो गाणं लिहिण्याचं, कंपोज करण्याच अन शूटिंग करण्याच काम मित्नांच्या मदतीनं करतो.अजित हा गावकडचा गलीबॉय आहे. त्याच्या शेतकरी रॅपला यू टय़ूबवर हजारो व्ह्यूज मिळाले. अनेक तरुण दोस्तांना आपल्या गावाकडच्या शेतकरी बापाची आठवणही या गाण्यानं करून दिली.सोशल मीडियामुळे अजितला रॅपर म्हणून ओळख मिळाली. गावाकडची पोरंही माध्यमांत चर्चेचा विषय ठरायली. ही पोरं काहीतरी भन्नाट करून दाखवतायंत, जे शहरी वतरुळालाही आवडतंय आणि वास्तव दाखवत आहे.अजितनं आपलं रॅपसाँग आई-वडिलांना दाखवलं तेव्हा नकळत त्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं. अजित गाणं बनवतोय एवढच त्यांना माहिती; पण रॅप-बीप असलं कायभी आम्हाला माहीत नाही, असं अजितचे वडील म्हणतात. तर, आमच्या पोरानं शेतकर्यावर हे गाणं बनवलंय ते पाहून खूप बरं वाटलं, आमचं रोजचं जगणं त्यानं लोकांपर्यंत पोहोचवलंय, ते आवडलं. अर्थात अजितन इंजिनिअरच व्हावं अशी त्यांची इच्छा आहे, तर आई-वडिलांची इच्छा म्हणूनच मी इंजिनिअरिंग करतोय, असं अजितनं लोकमतशी बोलताना सांगितलं. कारण त्याला आवड आहे ती गाणं लिहायची, कंपोज करायची अन् गायची. अजितने आजर्पयत सहा गाणे लिहिली असून गायलीही आहेत.
(महेश लोकमत ऑनलाइनमध्ये कार्यरत आहे.)