- शाहीन शेख ऑनररी सेक्रेटरी , नॅब
कोरोनाने सगळं जग उलटंपालटं करून टाकलंय. त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि त्याहीपेक्षा बेरोजगारीच्या समुद्रात हजारो लाखो लोक जगभर गटांगळ्या खात आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने हातपाय मारून आपण या बेरोजगारीच्या लाटेत बुडून जाऊ नये म्हणून प्रयत्न करतोय. हातातली नोकरी टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. समजा ही नोकरी गेलीच, तर निदान दुसरी लवकर मिळावी यासाठी नवीन स्किल्स शिकताहेत, ऑनलाइन कोर्सेस करताहेत.या नाही तर दुस:या इंडस्ट्रीत काम मिळेल का? आत्ताइतका नाही; पण निदान त्याच्या जवळपास येणारा तरी पगार मिळेल का, यासाठी लक्ष ठेवून आहेत. मात्र हे सारं सुरू असताना दुसरीकडे आपल्याच समाजाचाच एक लहान हिस्सा त्याच्या त्याच्या परीने या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांच्या समोरच्या अडचणींचा डोंगर आपल्या शंभर पट तरी मोठा आहे; पण तरीही ही माणसं काठीने रस्त्यातल्या खाचखळग्यांचा अंदाज घेत, कुठेतरी ठेचकाळत, त्यातून उभी राहात पुढे जायचा प्रयत्न करताहेत, कारण त्यांच्यासमोरसुद्धा आपल्यासारखाच दुसरा काहीही पर्याय नाहीये.आणि त्याहून मोठी अडचण अशी आहे की दुसरा काही पर्याय असला तरी त्यांना तो दिसणार नाहीये. कारण त्यांना काहीच दिसत नाही. त्यांना डोळ्यांनी दिसत नाहीये.ज्यांचं संपूर्ण आयुष्य ध्वनी आणि स्पर्श या दोनच संवेदनांवर चालतं, त्यांचं आयुष्य या क्षणी किती कठीण झालं असेल याची इतर माणसं केवळ कल्पना करू शकतात. कोरोनाने त्यांच्या आयुष्यातून त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा आधार हिरावून घेतला आहे, तो म्हणजे स्पर्श !आज कोणीही माणूस होता होईल तो दुस:या माणसाला स्पर्श करायचं टाळतो आहे. त्यामागची कारणं अगदी खरी आहेत. पण त्याची मोठी किंमत दृष्टिहीन माणसं मोजत आहेत. कारण आपल्याकडे दृष्टिहीन लोकांना सोईच्या कुठल्याही व्यवस्था सार्वजनिक ठिकाणी नाहीत, त्यामुळे त्यांचा सामाजिक वावर हा बहुतांश इतर समाजाच्या चांगुलपणावर अवलंबून आहे. मात्न एरव्ही दृष्टिहीनांशी अत्यंत सहानुभूतीने वागणा:या समाजाने स्वत:च्याही नकळत कोरोनाच्या भीतीने मदतीचा हात आखडता घेतला आहे. परिणामत: दृष्टिहीन लोकांना घराबाहेर पाडण्यासाठी संपूर्णत: त्यांच्या घरातल्या इतर व्यक्तींवर अवलंबून राहायला लागतं आहे. मुळात त्यांचं घराबाहेर पडणंच कमी झालं आहे; पण निदान बँकेची कामं, काही महत्त्वाची खरेदी अशा कामांसाठीसुद्धा त्यांना घरातल्या व्यक्तींवर अवलंबून राहायला लागतं आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी आपला कोणाला तरी त्नास होतोय ही भावना अतिशय त्नासदायक असते. कारण नेमकं तेच टाळण्यासाठी त्यांची सगळी धडपड चाललेली असते.त्यातही बहुतांश दृष्टिहीन तरुणही त्यांच्या सर्व अडचणींशी दोन हात करून शक्यतो आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी, कामांसाठी इतर कोणावर अवलंबून राहाणं त्यांना नको वाटतं. नेमकं ते स्वावलंबन या कोविड-19ने त्यांच्याकडून हिरावून घेतलेलं आहे.
अंध तरुणांना एवढी मदत करता येईल.
1. शक्यतो त्यांना मालकांनी नोकरीवरून काढू नये. सध्याच्या असुरक्षित काळात त्यांना इतर कुठलं काम करणं कठीण आहे.2. दृष्टिहीन व्यक्ती दिसली तर त्यांना मदत करा. मदत करून झाली की हात सॅनिटाइझ करा. त्यांचा सुखरूप वावर आपल्यावर अवलंबून आहे. यामुळे तो स्पर्श टाळू नका, सुरक्षित खबरदारी मात्र घ्या.3. त्यांच्या अडचणी डोळस लोकांपेक्षा जास्त तीव्र आहेत याचं भान ठेवा.4. वर्कफ्रॉम होममध्ये अंधांना कुठे सामावून घेता येईल का, याचा विचार करा.