शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

चल रंग दे...

By पवन देशपांडे | Updated: January 18, 2018 09:52 IST

अस्ताव्यस्थ फुगलेली घरं. त्या समोरून वाहणारा दुर्गंधीयुक्त नाला. कुबट वास. कच-याचा ढीग अन् निराशेच्या गर्तेत घेऊन जाणारे काळपट ठिगळा-ठिगळांचे इमले.

झोपडपट्टी म्हटलं की काय येतं डोळ्यांसमोर? भकास.. कळकट काजळी? अस्वच्छता? पण मुंबईतल्या घाटकोपरजवळच्याअसल्फा झोपडपट्टीत जा, ही वस्ती आता सुंदर रंगांनी रंगवण्यात आली आहे आणि सोशल मीडियात व्हायरलही आहे?काही तरुण कलाकारांनी एकत्र येत तिचं रुपच बदलून टाकलं..अस्ताव्यस्थ फुगलेली घरं...त्या समोरून वाहणारा दुर्गंधीयुक्त नाला... कुबट वास..कच-याचा ढीग अन् निराशेच्या गर्तेत घेऊन जाणारे काळपट ठिगळा-ठिगळांचे इमले...कोणत्याही शहरातल्या कुठल्याही झोपडपट्टीत दिसणारं हे दृश्य.मुंबईत तर अशा असंख्य झोपडपट्ट्या आहेत. जिथं बारा महिने अठरा काळ ही अशीच परिस्थिती पहायला अन् प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळते. या वस्तीत राहणारी कुटुंबं नागरी सोयींविना कशी जगत असतील, हा प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतो.मात्र मुंबईतल्या घाटकोपर येथील असल्फा गावातल्या डोंगरावर वसलेल्या एका झोपडपट्टीत जा, तुमच्या मनातलं कुठल्याही वस्तीचं हे चित्रच बदलून जाईल. आणि प्रश्न पडेल की शहरातली ही वस्ती अशी दिसू शकते?

राज्यातील पहिली मेट्रो ज्या मार्गावर धावते त्या घाटकोपर ते वर्सोवादरम्यान मेट्रोचं दुसरं स्टेशन असल्फा. तिथं उतरल्यानंतर असल्फा गावातला डोंगर दूरूनच दिसू लागतो. सध्या एखाद्या कॅन्व्हासवर वेगवेगळ्या रंगांची स्टिकर चिटकवावीत तसा तो डोंगर चौकोनी, आयाताकृती आकाराच्या वेगवेगळ्या रंगांनी उजळून निघाला आहे. अर्ध्या कच्चा-पक्क्या रस्त्यासारखी एक वाट या डोंगराकडे जाते. रस्त्याच्या दुतर्फा छोटी-छोटी दुकानं. एखाददोन ठिकाणी मोठ्या नाल्याची उघडी पडलेली भगदाडं. दुर्गंधी येतेच; पण थोडं पुढं गेल्यावर उजव्या बाजूला वर वाळत घातलेले पांढरीशुभ्र टॉवेल्स, पडदे इथं धोबीघाट असल्याचं सांगतात. रंगीत डोंगराची सुरुवात अशा शुभ्र रंगानंच होते. तिथूनच सुरू होत असलेल्या दगडी-सीमेंटमिश्रित पायºया असल्फाच्या झोपडपट्टीच्या डोंगराकडे घेऊन जातात. याच पायºयांजवळ तिथला तरुण रहिवासी भेटला. नाव पुष्पराज शेट्टी. रंगांच्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी पांढराशुभ्र शर्ट घातलेला हा पुष्पराज ‘रंगमित्र’ म्हणून समोर आला. त्यानं जे दाखवलं ते ‘झोपडपट्टी’च्या कोणत्याच संकल्पनेत न बसणारं होतं.

एक एक भिंत वेगवेगळ्या रंगांशी एकरुप झाली होती. डोंगराच्या सुरुवातीलाच एका झोपडीवजा घरावर ‘थिंग्स 2 डू इन मुंबई’ अशा आशयाचं चित्र मुंबईचं लाइफ दर्शवत होतं. आणखी दोन पायºया चढून गेलं की ‘डू मोअर नाऊ’ असंही ग्राफिक्स एका भिंतीवर दिसतं. रंगवलेली एक एक भिंत दाखवताना पुष्कराज सांगतो, ‘चल रंग दे’ नावाची एक संस्था आहे. या संस्थेची संस्थापक देदीप्या रेड्डी. या तरुणीच्या डोक्यातून ही भन्नाट आयडिया आली. ‘चल रंग दे’ ही मूळ फ्रुटबाउल कंपनीची संस्था. या कंपनीनं मुंबई मेट्रो वन, स्नोसेम पेंट्स आणि को-लॅब-ओरॅटरी एशिया या तीन कंपन्यांच्या साथीनं ही मोहीम हाती घोतली.

गारेगार एसी मेट्रोतून जाताना बाहेर खिडकीतून पाहिलं की गरिबीच्या खुणा दिसतात. झोपड्या, अस्ताव्यवस्त वाढलेल्या काही उंच इमारती, काही खुजी वेडी-वाकडी घरं पाहायला मिळतात. ही ओळख बदलण्यासाठी काय करता येईल असा विचार डोक्यात आला आणि त्यांनी मेट्रोतून-स्टेशनवरून दिसणारा हा झोपडपट्टीचा डोंगराळ भाग निवडला. रंगांची ही संकल्पना घेऊन ही संस्था आमच्या झोपडपट्टीत आली..’अर्थात या नव्या संकल्पनेलाही तशाच अडथळ्यांचा सामना करावा लागला. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाºया स्थानिकांना ‘कन्व्हिन्स’ करणं तसं मुश्किल होतं. सुरुवातीला लोकांना शंका आली की, ‘आपल्या झोपड्यांवर कुºहाड पडणार.’ काही लोक तर थेट ‘फुकट का रंगवून देताय तुम्ही... तुमचा काहीतरी इरादा असणार...’ असंही म्हणत होते. संशयाचाच रंग गडद होऊ लागला होता; पण हळूहळू खात्री पटल्यावर विरोध मावळू लागल्याचं पुष्पराज सांगतो.

दुसरी अडचण मात्र मोठी होती. प्रत्येकाला आपल्या ‘धार्मिक आवडी’नुसार रंग हवा होेता. स्पष्टच सांगायचं तर म्हणजे माझ्या घरावर हिरवा नको, मला भगवा नको किंवा मला निळा नको असं म्हणणारेही काहीजण होतेच; पण असतात काही ‘श्रद्धा’ म्हणून त्यातूनही मार्ग निघाला. आवडीनिवडीनुसार नाही देता आला तरी त्यांना नको तो रंग त्यांच्या भिंतीवर नसेल, इतपत आश्वस्त करत, रंगाच्या कामाला सुरुवात झाली.तशा इथं दोन हजारांवर झोपड्या. त्यात दुरून भिंती दिसतात अशा मात्र काहीशे होत्या. त्यामुळे शंभर-सव्वाशे भिंती रंगवायच्या ठरलं. केवळ ‘दुरून डोंगर साजरे’ होऊ नये म्हणून, झोपडपट्टीच्या मधल्या मुख्य पायºयांच्या आजू-बाजूला रंगीबिरंगी ग्राफिक्स करायचं ठरलं.एवढं सगळं काम एकट्याचं नव्हतं. मग सोशल मीडियावर एक ग्रुप तयार केला गेला. तरुणांना, कलावंतांना आवाहन केलं गेलं. आसपासचे मिळून सहाशे जण यासाठी स्वयंस्फूर्तीनं रंगकामाला तयार झाले. काही स्थानिक मुला-मुलींनी हिरिरीनं सहभागी व्हायचंही ठरवलं. एवढी मोठी टीम मिळाल्यानं काम सोपं झालं. सुरुवातीला चारशे जणांच्या टीमनं काम करायचं ठरवलं. त्यात काही शिकलेले आर्टिस्ट होते तर काही हौशे-गौशे. स्किलनुसार काम वाटलं गेलं. रंग-ब्रश दिले गेले. त्यातून मग कुठे मनिमाऊ साकारली गेली. कुठे लहान मुलगी साबणाचे फुगे उडवतानाचे चित्र रंगवले गेले. काही ठिकाणी स्वच्छतेचा संदेश, तर काही ठिकाणी ‘फ्री स्टाइल’ची चित्र.

या सा-या मोहिमेत संपूर्ण डोंगरावरील कुटुंबंही सहभागी झाले. आपल्या घरात दिवाळीला रंगकाम करताना चिमुकल्यांपासून सारेच कसे ब्रश घेऊन तयार असतात. तसंच इथंही पहायला मिळालं. काम करणारे अनेक तरुण-तरुणी बाहेरचे असूनही झोपडपट्टीवासींच्या कुटुंबाचे भाग झाले. वस्तीत राहणा-या गृहिणी अपर्णा चौधरी सांगतात, पूर्वी ही झोपडपट्टी बाहेरून भकास वाटायची; पण आता आम्हाला आमच्या या परिसराचाच अभिमान वाटू लागला आहे. इथल्या झोपड्या आता तुम्हाला झोपड्या वाटणारच नाहीत. आमचंही ‘घर’ झालं!’पुष्पराज सांगतो, इथल्या अनेक कुटुंबांनी रंगकाम करणा-या सगळ्यांना मदत केली. त्यात अपर्णा चौधरीही होत्या. त्यांच्याच घरात रंगकामाच्या काळात रंगांच्या डब्यांचे ढीग साचलेले होते. या कामात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या तरुणाईला चहापाणी देण्याचं काम त्यांनी मनापासून केलं.

अपर्णाताई सांगतात की, येणारे-जाणारे लोक आपल्या डोंगराकडे अप्रूप वाटल्यासारखं बघतात. फोटो काढतात, हे छान वाटतं. कधी आम्हीही मेट्रोतून प्रवास करतो तेव्हा एक-दोन प्रवासी तरी आम्हाला या रंगीत झोपडपट्टीबद्दल कुतूहलानं बोलताना दिसतात. बरं वाटतं. ज्या झोपडपट्टीकडं ढुंकूनही बघण्याची मानसिकता कोणाची नव्हती त्याची जागा आता आश्चर्यानं घेतली आहे.

असल्फाचा हा डोंगर चढताना प्रत्येक पायरी रंगाची साथ देते. ‘चल रंग दे’ संस्थेच्या या मोहिमेत अनेक ब्रश एकत्र आले अन् त्यांनी या दोन हजार कुटुंबांच्या झोपडपट्टीत सामाजिकतेचेही रंग भरले. त्यामुळे दुरून दिसणारा रंगांच्या चौकोनी ठिपक्यांचा हा डोंगर आतूनही तसाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक रंगीत आहे. अगदी इथल्या माणसांसारखा.. परतीच्या प्रवासात काही रंग आपल्याही सोबत परत येतात, माझ्यासोबतही आले..वस्तीत तरुण रोहित संकपाल. रोहित म्हणतो, असं काही घडेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता तर हा विषय एवढा चर्चेचा झालाय की फेसबुक अन् इन्स्टाग्रामवरही आमचा रंगीत ‘एरिया’ धुमाकूळ घालू लागला आहे. दुरून फोटो काढून, झोपडीच्या बॅकग्राउंडवर सेल्फी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करणा-यांची संख्या प्रचंड वाढली आहे. आमचा एरिया असा व्हायरल होईल, असं वाटलं नव्हतं. आता आम्हाला याचीही सवय होऊ लागली आहे.’असल्फाच्या या झोपडपट्टीत राहणा-या अनेक चिमुकल्यांनी ही अवतीभोवतीची भन्नाट रंगपंचमी पाहिली. त्यामुळे इथले लहान मुलं आता खडूच्या साहाय्यानं, रंगीत क्रेयॉन्सच्या मदतीनं अनेक ठिकाणी रेघोट्या ओढून चित्र काढू लागलेत. रंगांचे संस्कार, त्यांच्याशी दोस्ती ही कमाईही काही कमी नाही.

( पवन लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)

टॅग्स :Mumbaiमुंबई