मिलिंद थत्ते, संघटक, वयम् चळवळ -
मित्रहो, रामराम! ३0 जानेवारीच्या ऑक्सिजनमध्ये आमच्या ‘वयम्’ चळवळीविषयी ‘लाल दिव्याची गाडी तुमच्या दारात येतेच कशी’ हा लेख प्रसिद्ध झाला. तुम्हा सगळ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. दिवसरात्र फोन येत राहीले, ई-मेल आले आणि आता पत्रंही पोहोचू लागली आहेत. आमच्या तरुण गँगचे कौतुक तर सर्वांनी केलेच; पण बर्याच मित्र-मैत्रिणींनी आम्हाला ‘वयम्’ चळवळीत सहभागी व्हायचे आहे, कायदा शिकायचा आहे, आमच्या गावातला अन्याय दूर करायचा आहे, असंही कळकळीने सांगितले. काही जणांनी तर असंही सांगितलं की, आम्हीही असे प्रयत्न केले आहेत; पण यश आले नाही आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की, आता पुढे कसे जायचे ते सांगा.
कायदा शिकण्यासाठी, आपल्या गावात अशी लोकशाही चळवळ चालवण्यासाठी थोडेसे प्रशिक्षण आणि चार्जिंग गरजेचे आहे. असे दोन दिवसांचे निवासी शिबिर आम्ही २८ आणि २९ मार्चला नाशिक येथे आयोजित करण्याचं ठरवलं आहे. या शिबिरात माहिती अधिकार कायदा, ग्रामपंचायत कायदा, ग्रामसभेबद्दलचे नियम आणि रेशन/ अन्न सुरक्षा कायदा हे विषय असणार आहेत. यासोबत ‘वयम्’च्या अनुभवी कार्यकर्त्यांची संघबांधणी आणि नेतृत्त्व या विषयातली सत्रंही असणार आहेत. शिबिरासाठी नाव नोंदणी करणं गरजेचं आहे.
शिबिरात सहभागी व्हायचंय?
vayamindia@gmail.com
या पत्त्यावर तुमची ई-मेल पाठवा. ई-मेलमध्ये तुमचं नाव, वय, पत्ता, शिक्षण कळवावं. शिबिरात सहभागी होण्यासाठी शिक्षणाची कोणीतीही अट नाही.
* 7709353104 या नंबरवर एसएमएस पाठवूनही नाव नोंदवता येईल.
* या शिबिरात फक्त १७ ते ३0 वयोगटातील तरुणांना सहभागी होता येईल.
शिबिराची वर्गणी १00 रुपये आहे.
* नोंदणी करणार्यांमधून शिबिरार्थींची निवड केली जाईल.
----------------------------
लिहा.मनापासून!
ठेचा-टेंगळं-मस्ती-मॅजिक.
यापेक्षा वेगळं काय असतं लाइफ!
पण, त्यातही अनेक गोष्टी छळतात, रुततात, टोचतात आणि काचतातही.
कधी वाटतं घ्यावं बंडाचं निशाण हातात, तर कधी वाटतं, भिरकावून द्यावेत सारे नियम आणि बेड्या,
करावं काहीतरी खास.
असं ‘खास’ तुमचं,
तुम्हाला छळणारं,
डाचणारं, काचणारं
किंवा जगवणारं, फुलवणारं
जे जे म्हणून येतं तुमच्या मनात.
ते ते सारं लिहा.
तुमच्या जगण्याविषयी,
प्रश्नांविषयी,
आणि माणसांविषयीही.
त्यासाठीच ही जागा.
तिचं नाव,
टीटीएमएम.
पत्ता?- oxygen@lokmat.com