‘अॅप्टिटय़ूड टेस्ट’चा एक पॅटर्न असतो.
त्यात विविध प्रश्न विचारून, बोलते करून
आपलीच आपल्याला खरीखुरी ओळख पटवण्याचा प्रय} केला जातो.
एका टेस्टच्या पोटात अनेक टेस्ट दडलेल्या असतात.
त्यातून उलगडत जाते एक स्वत:लाच शोधण्याची प्रक्रिया.
त्या टप्प्यांची ही एक ओळख.
1) बेसिक
निसर्गत: जन्मजात ज्या काही क्षमता आपल्याकडे असतात. जी बुद्धिमत्ता असते, ती या चाचणीत मोजली जाते. ज्या बेसिक क्षमता आपण पान दोनवर पाहिल्या त्या या चाचणीत मोजल्या जातात. मुख्य क्षमता कुठली चांगली आहे, तुलनेनं कुठली क्षमता कमी आहे हे सारं या बेसिक चाचणीत मोजलं जातं. ही चाचणी अनेक ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह असते. म्हणजे दिलेल्या पर्यायातून एक उत्तर निवडायचं असतं.
2) आय क्यू.
म्हणजेच इंटेलिजन्स कोशण्ट. ज्याला बुद्धय़ांक म्हणतात. या चाचणीसाठी कुठल्याही पूर्वतयारीची गरज नसते. आपलं भाषेचं ज्ञान कसं आहे, बोलतो कसं, यांत्रिक गोष्टी कशा पाहतो, आपल्या पाहण्याच्या, कल्पनाशक्तीच्या क्षमता कशा आहेत हे सारं यात मोजलं जातं. ही चाचणी विनातयारीच करतात. त्यातून आपल्या बुद्धय़ांकाचा एक अंदाज येऊ शकतो. या परीक्षेचं माध्यम भाषा नसते, चित्र असतात. चित्र पाहून आपल्याला आपली उत्तरं द्यायची असतात.
3) व्यक्तिमत्त्व चाचणी
या चाचणीला अलीकडच्या काळात अत्यंत महत्त्व आलेलं आहे. बुद्धय़ांक चांगला आहे, थिअरीत त्या विषयाला चांगली गती आहे. मात्र व्यक्तिमत्त्व साजेसं नसेल तर मात्र गोंधळ होतो. त्यातून मग आत्मविश्वासही कमी होतो. आणि त्या कामासाठी साजेसं व्यक्तिमत्त्वच नसल्यानं कामात मन रमत नाही. म्हणून आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे हे समजून घेण्यासाठी ही पर्सनॅलिटी टेस्ट करतात. अबोल आहे की बोलकं, मनमिळावू, सोशल की एकांतवासी, एकेकटं काम करतो की संघात चांगलं काम करतो, इतरांशी वागतोबोलतो कसा हे सारं या चाचणीतून कळू शकतं.
बुद्धी कितीही चांगली असेल पण व्यक्तिमत्त्व त्याविरुद्ध असेल तर उत्तम करिअर घडणार नाही. अबोल मॅनेजर, अबोल सेल्सपर्सन कसे काम करणार?
म्हणून करिअर निवडताना आपल्या व्यक्तिमत्त्वाचीही ओळख होणं गरजेचं असतं.
4) आवडीनिवडीचा शोध
या चाचणीला इंटरेस्ट इन्व्हेण्टरी असंही म्हणतात. विशेषत: तरुण वयात आज एखादी गोष्ट आवडते, उद्या भलतीच! परवा आणखी काही. कधी ग्लॅमर, कधी पैसा, कधी पॅशन यातून अनेक करिअर कधी आवडतात कधी नावडती होतात. मग नक्की आपल्याला आवडतं काय याचा शोध या चाचणीतून घेतला जातो. तुम्हाला काय आवडतं याचं रेटिंग एक ते पाचच्या स्केलवर करायला लावतात. प्रश्न उलटसुलट विचारले जातात त्यातून मग कळू शकतं की सगळ्यात जास्त काय आवडतं. अनेकदा आपल्याला जे आवडतं असं वाटतं तेच कायम आवडेल असंही नसतं. या चाचणीतून ती योग्य आवड समजायला मदत होते.
5) स्वत:विषयी लिहा
अनेक मुलं स्वत:विषयी बोलत नाहीत. मनातलं सांगत नाहीत. खरं काय हवं हे पालकांच्या दबावामुळेही बोलू शकत नाहीत. त्यांची स्वत:शीच ओळख नसते. ती व्हावी, त्यांना आपल्याला नक्की काय हवंय हे कळावं, ते स्वत:कडे कसं पाहतात हे कळावं म्हणून निबंध लिहायला सांगितला जातो. स्वत:विषयी!
6) स्किल टेस्ट
व्यक्तिमत्त्व कसं आहे हे जसं आताशा महत्त्वाचं आहे, तसंच आपल्याकडे कुठली स्किल्स आहेत आणि आपण कुठं कमी पडतो हे माहिती असणंही अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच अॅप्टिटय़ूड इतकीच महत्त्वाची ठरते ही स्किल टेस्ट. केवळ काही महत्त्वाची स्किल्स नाहीत, किंवा ती हवीत हे माहिती नाही म्हणून करिअरमध्ये अनेकजण मागे पडतात. म्हणूनच या टेस्टमध्ये इंटरपर्सनल स्किल्स, सॉफ्ट स्किल्स तपासली जातात.
नव्या काळात ही चाचणी अत्यंत महत्त्वाची. आपला स्किल सेट सुधारण्यासाठीही त्याची मदत होऊ शकते.
या टेस्ट करायच्या कधी?
खरं तर कधीही करायला हरकत नाही. करिअर निवडीच्या टप्प्यावर तर आवश्य करावी. मात्र नववीतून दहावीत जाताना ही टेस्ट केली तर सर्वाधिक फायद्याची. कारण या टेस्टमधून अभ्यासाची पद्धत म्हणजे लर्निग स्टाइलही कळते. त्यामुळे कुठल्या पद्धतीनं अभ्यास केला तर पुढच्या परीक्षा सोप्या होतील हेदेखील कळू शकतं.
मात्र नववीत नाहीच जमलं तर दहावीनंतर, बारावीनंतर, ग्रॅज्युएशननंतरही या टेस्ट करता येतात.
लर्निग डिसअॅबिलिटी? चाचणी करा.
ज्यांना शिकताना अनेक अडचणी येतात, कळतच नाही. शिकवलेलं पटकन येत नाही, त्या मुलांनाही या टेस्ट करता येतात. नेमकं का त्यांना नीट शिकता येत नाहीये हे त्या चाचणीतून कळतं!