- कॉलेजातल्या ‘उद्योगांनी’ काय शिकवलं?
कॉलेजचा शेवटचा दिवस. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सुरू होता. ‘बेस्ट आउटगोइंग स्टुडंट’ म्हणून माझं नाव घोषित झालं आणि दोन मिनिटं मी अक्षरश: हवेत गेलो. माझं एक स्वप्न पूर्ण झालं होतं. पण दोन मिनिटांनी भानावर आल्यावर लक्षात आलं की, अरे मुक्काम तर महत्त्वाचा आहेच, पण त्याहून सुंदर हा इंजिनिअरिंग कॉलेजमधला प्रवास होता. स्वप्न बघायला शिकवणारा, त्यासाठी झटू देणारा आणि जगण्याची गोष्ट आपल्या नकळत सांगून जाणारा.
चार वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. अकरावी-बारावीला आय.आय.टी.ची तयारी करत असल्यामुळे कॉलेजात फारसे कधी गेलो नाहीच. त्यामुळे, इंजिनिअरिंग कॉलेजला गेल्यावरच खर्या अर्थानं कॉलेजलाइफ सुरू झालं. वर्गात ओळखणारं कोणीच नाही. मराठी शाळेत शिकलेलो त्यामुळे जरासा बावरलेलो. त्यातच दुसर्या दिवशी सी.आर.ची (वर्गप्रतिनिधी) निवड होणार होती. मी काही जिंकणार नाही, असे वाटत होते. कारण, वर्गात कोण ओळखतच नाही तर मत कोण देणार! पण, उभारायला काय जातंय? म्हणून मी स्पर्धेत उतरलो आणि काय आश्चर्य, मी बहुमताने निवडून आलो. त्या क्षणापासून कॉलेजने ज्या असंख्य संधी/दरवाजे मला खुले केले. तिथं मी पहिला धडा शिकलो. टेक चान्सेस टेक रिस्क.
पहिल्या वर्षाचा लीडर म्हणून प्रवास सुरू झाला. छोटे-छोटे कार्यक्रम व्हायला लागले. एव्हाना बर्यापैकी लिहायला लागलो होतो, पण इंग्रजीची मात्र जरा बोंबच होती. तेवढंस फ्लुएंट इंग्लिश बोलता येत नव्हतं. यावेळी दोन इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या. आमच्या होनगेवर सरांनी सांगितलं, आपल्या पेट्रोल पार्टनरशी रोज कम्पलसरी इंग्लिशमध्ये बोलायचं. का कोणास ठाऊक आम्ही दोघांनी ते प्रत्यक्षात आणलं. आधी खूप विचित्र वाटायचं, मित्र हसायचे पण, सहा महिन्यांनी जेव्हा मनात आत्मविश्वास आला तेव्हाच्या भावना अफलातून होत्या. याचवेळी कॉलेजमधला एक सिनिअर फस्र्ट इअरच्या मुलांना इंग्रजी शिकवायचा. सुट्टीच्या दिवशी तीन तास. ‘बॉन्ड विथ वर्ल्ड’ असं त्या उपक्रमाचं नाव होतं. जरासा उशिराच त्यात सामील झालो, पण नंतर जे काही घडले तो र्मयादित अर्थाने इतिहास होता.
सिनिअर फक्त रॅगिंग करायला नसतात, खूप सारे सिनिअर मदत करायला तयार असतात. आपण फक्त अँप्रोच होत नाही. या सिनिअर मित्रानं माझ्यावर फक्त विश्वासच टाकला नाही, तर अत्यंत प्रेमानं ‘बॉन्ड विथ वर्ल्ड’ची धुरा माझ्या खांद्यावर सोपवली. आम्हीही मग प्रयत्नातकसूर ठेवली नाही. दरवर्षी वेगवेगळे प्रयोग केले आणि आज ‘बॉन्ड विथ वर्ल्ड’ हा जगणं शिकवणारा कोर्सच झाला आहे. त्यात जवळपास ५00 विद्यार्थ्यांनी सलग शिक्षण घेतलं आहे. तेही फन गेम, व्हिडिओ अशा मजा करत. याच संकल्पनेने ‘टेकफेस्ट’मध्ये ही विजयाची पताका रोवली आहे. लौकिक यश आपण थोडे बाजूला ठेवू, पण गेली चार वर्षं दर सोमवारी नवे काहीतरी डिलिव्हर करायचे. तीन तास शिकवायचे, शिकायचे या एक्सरसाईजमुळे मी आणि माझे मित्र जे घडलोय ते या सगळ्यांच्या पलीकडे आहे. असे रिअल शिक्षण मिळायला भाग्य लागते. अभ्यासक्रम निर्मिती, शिक्षण, फीडबॅक, नेतृत्व, माणसांना हाताळणं, सारं काही या एका उपक्रमानं शिकवलंय मला.
दुसर्या वर्षी अनुभवांचा पट असाच विस्तारला तो ‘स्टुडंट कौन्सिल’मध्ये संधी मिळाल्यानं. निवडणुकीच्या राजकारणात शिरायला न लागता शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर मला वाईल्ड कार्ड एंट्री देण्यात आली. या वर्षात मी खर्या अर्थानं ग्रो झालो. कॉलेजमधील ३000 मुलांचं अधिकृत नेतृत्व आम्ही ८ जण करत होतो. जबाबदारी म्हणजे काय हे इथं समजलं. कॉलेजचं व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय कसा साधायचा ते शिकलो. महत्त्वाचं म्हणजे या प्रोसेसमध्ये प्रचंड वेळा धडपडलो, चुका केल्या, डोक्याचा अक्षरश: भुगा व्हायचा, विचार करून राग यायचा. गोष्टी कधी कधी मनासारख्या घडायच्या नाहीत. दोन पावलं मागं यायला लागायचं. चार वाजता कॉलेज संपलं की आम्ही ८ जण जमायचो. बाकीचे सातही जण मला सिनिअर होते. सहा वाजेपर्यंत खलबतं करायचो. त्यातही काही निर्णय चुकले, काही परफेक्ट जमले पण शिक्षकांनी आम्हाला निर्णय घ्यायची संधी दिली म्हणून आम्ही पोरं त्यातून बरंच काही खर्या अर्थानं शिकलो. त्याचाच परिणाम म्हणून मग नंतरच्या वर्षी ‘युनिर्व्हसिटी मेंबर’ आणि त्यानंतर थेट ‘सांस्कृतिक प्रतिनिधी’ म्हणून चढत्या भाजणीनं सलग तीन वर्षे महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व करता आलं. शेवटच्या वर्षी तर मॅनेजमेंटने थोडा अधिकच विश्वास देऊ केला त्यामुळे लाँगटर्म बदल घडवणारे काही निर्णय घेता आले. एक गोष्ट मला पक्की समजली की, तुमच्यात गुणवत्ता असेल तर तिला संधी द्यायला लोक कायम तत्पर असतातच. इव्हेंटस् आणि पेपर प्रेझेंटेशन हा तर कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजचा जीव की प्राण. त्यात उडी मारायची हे प्रत्येकानं ठरवलेलंच असतं. पण हे सगळेच करतात. त्यात वेगळं काय तरी करायला हवं अशा विचारातून थेट आंतरराष्ट्रीय टेकफेस्टमध्ये उतरायचं ठरलं. ‘कचरावाला’ नावाची संकल्पना मनात होती. अर्थात गोष्टी बर्याच अवघड होत्या. कोल्हापूरसारख्या ठिकाणाहून या स्पर्धेला फारसं कोणी जायचं नाही शिवाय मी तर मुंबईही कधी त्याआधी पाहिली नव्हती. पण पाण्यात पडलं की पोहता येतंच तसंच झालं. आता आमच्याच कॉलेजमधून जवळपास दरवर्षी १00 एक जण टेकफेस्टला जातात. त्यात आमच्या टीमचा खारीचा वाटा आहे, याचं समाधान वाटत राहतं.
इव्हेंटची सुरुवातही अशीच झाली. दुसर्या वर्षी डिपार्टमेंटला रुजू झालो होतो. वातावरण नवं होतं. पण डिपार्टमेंटल इव्हेंटची भारी क्रेझ होती. असे इव्हेंट हे प्रत्येक डिपार्टमेंटसाठी प्रेस्टिज पॉइंट असतात. मला वाटलं, आपण आपल्या इव्हेंटला अच्युत गोडबोलेंना बोलावलं तर? मी सरांना विचारलं, कोणतेही आढेवेढे न घेता ते हो म्हणाले. त्या क्षणापासून मी ‘इलेक्ट्रोफेस्ट’च्या कोअर टीमचा भाग झालो. ‘आजची तरुणाई ऐकत नाही’ या गैरसमजाला छेद देण्यासाठी त्यातूनच मग ‘अभिग्यान’चा जन्म झाला. त्याद्वारे दोन वर्षांत कॉलेजमध्ये विविध क्षेत्रांतले १५ मान्यवर येऊन गेले. आणि दरवेळी जवळपास १000 तरुणांनी त्यांना ऐकले. तेही प्रवेशमूल्य देऊन. एखाद्या कार्यक्रमाचे नेतृत्व करणे ही सर्वात चॅलेंजिंग आणि तितकीच आनंददायी गोष्ट असते. बाकी सारं ठीक, पैशाची गणितं जमवणं सोपं नसतं. शून्यातून सुरुवात करून ३-४ लाखांचे गणित जमवायचे असते. ५-६ जिल्ह्यातल्या कोपर्या कोपर्यातल्या मुलांपर्यंत तुमचा कार्यक्रम पोहाचवायचा असतो. विशेष म्हणजे आपल्यासोबत काम करणारी सारीच माणसं तरुण रक्ताची आणि आपल्याच वयाची असतात. त्यांनी स्वत: नेतृत्व न करता आपल्यावर विश्वास का दाखवावा? त्यासाठी मग सर्व गुण पणाला लावावे लागतात. जगात एकटा माणूस काही करू शकत नाही. टीम लागतेच. ते सारं इथं समजतं. आयत्यावेळी लागणारी समईची वात, कापूर कुठून मिळवायचा इथंपासून ते कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी जाम पाऊस पडला तर काय करायचं इथपर्यंत सारं आपोआप शिकायला लागतं. सिनियर-ज्युनिअर्सपासून शंभर जणांच्या शंभर तर्हा आणि इगो सांभाळण्याचे कसब मिळते.
चार वर्षांचा प्रवास हा असा विविध प्रवाहातून होत नुकताच १५ एप्रिलला संपला. कित्येकांना या माझ्या फुशारक्या वाटतील पण, यातला ‘मी’ हा प्रातिनिधिक आहे. इथं जगातला कोणीही माणूस असू शकतो नव्हे प्रत्येक महाविद्यालयामध्ये तो असतोच. मला खरी मजा वाटते ती या स्वत:ला विकसित करायच्या प्रवासामध्ये. तो प्रवास आपण करत आहोत का ते फक्त पाहायला हवं. पुस्तकी ज्ञान तर महाविद्यालयात मिळतंच, ते मिळवायला आज इतर अनेक माध्यमंही हाताशी आहेत. मग, कॉलेजात का जायचे, तर कॉलेज जगायला शिकवते. तेही अगदी फुकटात. नंतरच्या आयुष्यात आपण हे असे काही करायचे ठरवले तर ते शक्यसुद्धा नाही आणि, त्यात धडपडलो तर त्याचे जबर मोल द्यावे लागते. कॉलेजात मात्र आपलं काही चुकलं तरी आपल्याला त्याचा फारसा काही सेटबॅक बसत नाही. फुकट मिळालेली प्रयोगशाळा आहे ही, स्वत:ला एक्स्प्लोर करण्यासाठी.
चला तर मग, कॉलेजात कट्टय़ावर टाइमपास करूच, प्रेमप्रकरणंही करू, (ती पण हवीतच.) पण त्याहीपलीकडे जायला बघू. येणार्या संधी घेऊ. नसतील तर संधी निर्माण करू. आपण काय चीज आहोत ते सार्या जगाला दाखवून देऊ. कारण ये समा हमारा है.!
- विनायक पाचलग (पुस्तक लिहिण्यापासून आरजेगिरी करण्यापर्यंत आणि ‘टेकफेस्ट’पासून फिल्म फेस्टिव्हलपर्यंत असंख्य इव्हेण्टमध्ये सहभागी होत, नुकताच इंजिनिअर झालेला हा दोस्त.)