- भक्ती सोमण
उद्या गुरूपोर्णिमा. गुरूंविषयी काय वाटतं त्याविषयी मेसेजेस, चर्चा आणि फोटोजही या काळात सोशल मिडीयावर भरपूर झळकतील. ही गुरूंविषयी चर्चा फक्त एकच दिवस होत राहील. पण त्यानंतर.... आपल्या आयुष्यात गुरूंचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. आईनंतर आपल्यावर जगण्याचे अगदी पहिले संस्कार करणारे शिक्षक हे आपले गुरू तर आहेतच. पण जगण्याच्या आनंदात अचानक आलेल्या अडचणींचा गुंता सोडवताना आयुष्यात आलेली समदु:खी व्यक्ती त्याचं दु:ख बाजूला सारून किती पॉझिटिव्हली आयुष्य जगता येते ते दाखवते. त्याच्याकडून ती कला आत्मसात करताना तो मित्र कधी गुरू होऊन जातो ते कळतही नाही. गुरूची अशी कितीतरी रूप सांगता येतील. कधी तो जीवनातल्या महत्वाच्या टप्यात मदत करणारा मित्र होतो. तर कधी जगण्याची नेमकी दिशा दाखवणारा वाटाड्या होतो. आपल्या करीअरमध्येही आपल्याला घडवणारे अनेक गुरू आपल्याला टप्याटप्यात भेटत जातात. पण आयुष्यभरासाठी ज्यांच्याशी आपली नाळ जोडली जाते ते म्हणजे शाळेतले गुरू. आज माझ्या आर्यन हायस्कूल या शाळेतल्या प्री-प्रायमरी शाळेच्या सुषमा ताई, मोठ्या वर्गातल्या नरसाळे बाई, लवाटे बाई, श्रोत्री बाई, कोळंबेकर बाई, महाले सर, अक्रे सर अशा असंख्य शिक्षकांबर आमच्या वर्गातल्या सर्वांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. केवळ, आम्ही आहोत तुमच्यासाठी! हे त्यांचे वाक्य मनाला उभारी देते. शिक्षकांनी आपल्याला एका टप्यावर घडवलय म्हटल्यावर त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटतेच. पण त्यांना काहीतरी होतय म्हटल्यावर आपलाही जीव कासावीस होतो. मध्यंतरी आमच्या कोळंबेकर बाईंना खूप मोठ्या आजारपणाला सामोरे जावे लागले. त्यावेळी सागर, समीर, रोहन स्नेहा, स्नेहल, कोमल, स्मिता यांनी त्यांना आर्थिक मदत देण्यापासून पुढे केलेली थोडी थोडकी धावपळही बाईंना खूप उभारी देऊन गेली. विद्यार्थांचे हे रूप बाईंना नव्याने कळले असणार. पण, एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या धावपळीत शिक्षकांची विचारपूस करणे हेच किती सुखावह वाटले असेल त्यांना. नाही का? फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षकही असे ठामपणे आपल्या पाठीशी संकटे आल्यावर उभारी देण्यासाठी उभे राहतात याचा अनुभव अनेकदा घेतला आहे. आयुष्याच्या वळणावर भेटलेल्या शिक्षकांना पुन्हा भेटायला मिळावे म्हणून रियुनीयन करण्यावरही आता विद्यार्थी भर देतात. मात्र यात आघाडीवर असतात ते शाळांचेच विद्यार्थी. याचा अर्थ कॉलेजमधले शिक्षक काहीच घडवत नाहीत असा होत नाही. त्यांनीही आपल्याला जगण्याचं संचित दिलेलं असतचं. भरकटलेल्या मनाला योग्य मार्गावर आणलेलं असतं. असे अनेक शिक्षक वेगवेगळ््या पद्धतीने आपल्यावर संस्कार करत असतात. पण का कोण जाणे, शिक्षक या विषयावर संवाद साधला की सगळ्यांनाच शाळेतले शिक्षकच आठवतात. कारण हेच की जगण्याचा पहिला धडा १० ते १२ वर्षे त्यांच्याकडून मिळतो. म्हणूनच... गुरू है तो जीवन है... बरोबर ना!