स्नेहा मोरे
‘तो’ असून नसल्यासारखा...!(एका रात्री मुसळधार पावसात आपल घरं, माणसं हरवलेल्या तरुणीच्या मनातला पाऊस)बरसण्यासाठी दाटी-वाटीने जमणारे ढग, आपापली दिशा शोधणारे थेंब, ‘त्याच्या’ स्वागतासाठी वाऱ्याची सुरु असलेली धडपड, ‘तो’ येणार याची वार्ता एकमेकांना देणारे पक्षी, ‘त्याच्या’ येण्याने नव्याने जन्माला येणारे अंकुर, त्याला कवेत सामावण्यासाठी सज्ज असलेला निसर्ग.. या सगळ््यात ‘ती’ नव्हतीच.. कारण ‘तो’ तिच्यासाठी असून नसल्यासारखा...!काही वर्षांपूर्वी ‘ती’सुद्धा ‘त्याची’ वाट पाहत असे. खिडकीत बसून रात्रभर ‘त्याला’ पाहणं, कधीतरी ‘त्याचं’ होऊन जाणं, ‘त्याला’ मन भरुन डोळ््यात साठवणं, ‘त्याच्या’येण्यासाठी प्रार्थना करणं हे तिचं नेहमीचचं.. एकदा ‘त्याच्या’साठी ती खोटं बोलली होती, ‘त्याच्या’साठी तिने मारही खाल्ला.. एकेकाळी ‘त्याचं असणं, तिचं हसणं’ होतं.अगदी तिला समजायलं लागल्यापासून ‘त्याने’ सोबत दिली. ‘तिच्या’ प्रत्येक सुख- दु:खात ‘तो’ पाठीराख्यासारखा उभा राहिला. ‘त्याच्या’साठी तिने बऱ्याचदा शाळेला दांडी मारली. आई ओरडायची तरीही ‘त्याला’ मिठीत घेण्यासाठी ती अंगणात धावायची. निळ््याशार आकाशाखाली ‘त्यांचा’ डाव मांडायचा...रात्री चांदणं पडेस्तोवर ‘तिने’ कधीच त्याची साथ सोडली नाही.‘त्याच्या’कडून ‘ती’ प्रेम करायला शिकली, ‘त्याच्या’ हातात हात घालून मैत्री टिकवली ‘तिने’, लहानाची मोठीहोईपर्यंत दरवर्षी न चुकता जवळच्या नातलगासारखं ‘तो’ भेटायला यायचा ‘तिला’, मनमोकळेपणे स्वच्छंद जगायला ‘त्यानेच’ शिकवलं तिला.. ‘ती’ खूप निर्धास्त जगू लागली ‘त्याच्या’ साथीने पण...एका रात्रीनंतर अचानक ‘त्यांच’ नातं अनोळखी झालं... त्या रात्री ‘तो’ आला, त्याने सगळं होत्याच नव्हतं केलं.. आणि आपल्या माणसांसोबत जगणाऱ्या ‘तिला’ एका क्षणात एकटं पाडलं! यंदाही ‘तो’ आलाय...पण ‘त्याची’ वाट पाहणं ‘तिने’ कधीच सोडलं.. ‘तिच्या’साठी ‘तो’ आता असून नसल्यासारखाच...‘तिच्या’ मनात एकच आठवण कोरलीय, ‘सगळी दु:खं, सगळ्या यातना, सगळे आवेग घेऊन येतो.., कुठून कसा कोण जाणे, अवेळी हा ‘पाऊस’ येतो..’