‘.घर सोडून जाण्याचे दिवस फायनली येऊन ठेपलेच.’
-हे वाक्य वाचून कितीही सेण्टी वाटलं तरी अनेकांच्या आयुष्यात येत्या काही दिवसांत हा ‘दिवस’ उजाडणार हे नक्की आहे.
दहावीनंतर, बारावीनंतर, इंजिनिअरिंग, मेडिकल असं पुढच्या पुढच्या शिक्षणासाठी आपापली घरटी सोडून पाखरं दूरची गावं गाठतीलच. आयुष्याची एक नवीनच फेज सुरू होईल. सुरुवातीला वाटतं आता आपण स्वतंत्र, कसली रोकठोक नाही. काय वाट्टेल ते करायचं, काय वाट्टेल ते खायचं, घरच्या दाल-चावलचा जुलूम नाही.
पण हे ‘काय वाट्टेल’ ते खायला मिळायला लागलं की, ‘घरचे दाल-चावल’ याद यायला लागतात आणि मग जाम रडू येतं.
सहा वर्षांपूर्वी याच टप्प्यातून मीही गेलोय. मी चंदीगडचा, पंजाबी वळणाचं दाना-पानी सोडून एकदम बंगळूरूला लॉ करायचं म्हणून येऊन पोहचलो. चंदीगडच्या सामाजिक-भौगोलक-सांस्कृतिक वातावरणापेक्षा बंगळुरूचं वातावरण खूपच वेगळं होतं. खाणं-पिणं तर त्याहून वेगळं. पहिले काही महिने मला प्रचंड अवघड गेले. माझ्या चवींशी तिथल्या चवींचं गणित काही बसेचना. त्यात कॉलेजच्या/हॉस्टेलच्या मेसमधलं जेवण तर घशाखाली उतरतच नसे. त्यापेक्षा कुठंतरी बाहेर जाऊन, रोडसाईड ठेल्यावर खाणं किंवा सॅण्डविच भरणं असा उद्योग सुरू झाला. त्यावर उपाय म्हणून मग मीच कॉलेज कॅम्पसमध्ये ‘भुक्कड’ नावाचं एक छोटंसं फूड जॉईण्ट सुरू केलं. जे माझ्यासारख्या तरुण मुलामुलींना खायला आवडेल आणि हेल्दीही असेल असे पदार्थ मी आणि माझे मित्र त्या आमच्या स्टॉलवर बनवू लागलो.
पण तरीही घराबाहेर हॉस्टेलवर रहायला गेलं, मेसचं पाणीदार वरण खावं लागलं की काय होतं हे मला चांगलं माहिती आहे. या सार्या टप्प्यातून आता अनेक नवीन मुलं जातील. वैतागतील, चिडतील. सतरा ठिकाणी मेस लावून पाहतील. नकोच ती मेस म्हणून मग कुठल्या तरी साध्याशा हॉटेलात जाऊन वडा-पाव, रगडा, नी सॅण्डविच असं कोरडं कोरडं खातील.
दिवसातला सर्वात जास्त वेळ हा वर्गापेक्षा आपल्याला आवडणार्या फूड जॉईण्टला जाऊन बसण्यातच जायला लागेल. तिथंच ग्रुप बनतील, यारी-दोस्तीच्या गप्पा, तुफान मजा केली जाईल. त्या खाण्याला जी चव येते ना ती आयुष्यात दुसर्या कुठल्याच पदार्थांना येत नाही. शहरातले नवनवीन स्वस्त आणि मस्त कट्टे शोधून काढण्याचा छंदही अनेकांना लागेल. तो एक फेवरिट टाइमपासच बनून जाईल. त्यात हॉस्टेलच्या रूम्स, पीजी रूम्स ह्या तर दंगा करण्याच्या हमखास जागा. रात्री दोन दोन वाजेपर्यंत गप्पा आणि मग मध्यरात्री खाण्याच्या चट्टामट्टा. लपूनछपून रात्रीच्या ठेल्यावर जाणं, मस्त व्हेज-नॉनव्हेज हादडणं, टीटीएमएम करकरून, एखाद्याला बकरा करून खाणं हे सगळं नेमानं सुरू होईल. वेफर्स-मॅगी-बिस्किट हे म्हणजे तर जीव की प्राण. सगळं वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथं हादडणं सुरू होईल. मज्जा, फक्त मज्जा, खाणं हा प्रकार इतका आनंदी असेल असं घरी असताना समजतच नव्हतं असं वाटू लागेल.
पण हे सारं किती दिवस, महिना-दोन महिने?
नंतर नंतर या सार्याचाच कंटाळा यायला लागतो. बाहेरचं खाणं, हॉस्टेलची मेस, तिथल्या त्याच त्या भाज्या, त्यांना नसलेल्या चवी, हॉटेलातले मसालेदार पदार्थ, त्यापायी होणारा खर्च. नेमानं होणारा अपचन आणि अँसिडीटीचा त्रास हे सगळं सुरू होतं.
अनेक दिवस तर असे जातात की खाण्यापलीकडे दुसरं काहीच सुचत नाही. सतत खायचा विचार, सतत चिडचिड, सतत काय खाऊ, कुणाला खाऊ अशी मनाची अवस्था. जी उबून जातो. आई तरी घरून किती आणि काय काय करून पाठवणार? आणि ते आलं तरी अख्खं हॉस्टेल त्याच्यावर तुटून पडतं की लाडू-वड्या, पराठे, लोणची, खाकरे सगळे एका रात्रीत संपून जातं. मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.
त्यात नाश्ता हा प्रकारच आयुष्यातून हद्दपार होऊन जातो. डायरेक्ट जेवण. तेही गारमटक. त्यात व्यायामबियाम काही नाही. एकदा जेवलं की पुन्हा संध्याकाळी काहीतरी खायला जमेल याचीही गॅरण्टी नाही कारण अनेकदा खिशाला परवडतच नाही. मग थेट रात्री जेवण. जेवणात तेच ते म्हणून संताप. सकाळी पोळी-भाजी-वरण भात, रात्री पुन्हा तेच. फारतर उसळी यापलीकडे बदल नाही.
जेवणात असं खूप अंतर राखल्यानं, नाश्ता न केल्यानं, संध्याकाळी काहीच न खाल्ल्यानं, व्यायाम न केल्यानं तब्येत हमखास बिघडते. कितीतरी मुलं कॉलेज सुरू झालं की दोन-तीन महिन्यांतच पोटदुखी, पित्तानं बेजार होतात. आजारी पडतात. एवढय़ा उत्साहानं दुसर्या शहरात शिकायला जातात; पण ते शहर काही त्यांच्या पचनी पडत नाही.
मग आता तुम्ही म्हणाल, यावर उपाय काय?
चांगली मेस मिळणं हे तर चांगली मुलगी मिळण्याहून अवघड. मग खायचं काय? हॉटेलात जायचंच नाही का मज्जाच करायची नाही?
-ते सगळं करा. फूड जॉईण्ट्सवर जा, वेगवेगळे पदार्थ खाऊन पाहा, वेगवेगळ्या टेस्ट ट्राय करा. पण तरीही एक गोष्ट विसरली जाते म्हणून सारी गडबड होते.
ती म्हणजे, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी काहीतरी च्याऊम्याऊ आणि रात्री नीट आणि वेळेवर जेवण काही मिळत नाही, केलं जात नाही.
ते करा, नीट करा. आणि मग बघा, आहे तेच लाइफ तुम्हाला किती छान एन्जॉय करता येईल.
त्यासाठीच या काही सहज जमतील अशा, स्वत:च्या अनुभवातून जमवलेल्या फ्रेण्डली टिप्स.
वाचा, ट्राय करून पाहा.
बी स्मार्ट, बी हेल्दी.!
खायें तो खायें क्या?
अँडमिशन घेतानाच हॉस्टेलच्या खाण्याचा दर्जा काय हे तपासा. तो चांगला नसेल तर बाहेर एखादी घरगुती मेस शोधून तिथं डबा लावा.
काय वाट्टेल ते झालं तरी नाश्ता-दोन वेळचं जेवण यावरच्या खर्चात कॉम्प्रमाईज करायचं नाही. त्यातल्या त्यात घरगुती साधी जागा पहा म्हणजे पैसे वाचतील, जेवणही घरगुती असेल. शक्यतो तुम्हाला ज्या पद्धतीचं जेवण आवडतं ते कुठं मिळतं, मिळू शकतं, अशी जागा शोधा.
नाश्ता अजिबात स्किप करायचा नाही. हॉस्टेलवरची मेस कितीही वाईट असली तरी तिथं ठरलेल्या वेळेत नाश्ता करावाचा लागतो. ती शिस्त महत्त्वाची. काहीही हो, सकाळी उठल्या उठल्या पोटभर नाश्ता करायचाच.
शक्य असेल तर रूममध्ये दूध, ओट्स, सिरील असे पदार्थ आणून ठेवा. ते खा. फळं संध्याकाळी खा.
मध्यरात्री गंमत म्हणून एखाद्या दिवशी खाणं वेगळं, पण रोज रात्री नाही, रात्रीचं जेवण नऊच्या आत झालंच पाहिजे.
शक्यतो बिस्किटं, वेफर्स, पाव, बर्गर हे पदार्थ सारे खाणं टाळा. ते कोरडे असतात त्यामुळेही त्रास होऊ शकतो.
व्यायाम करा. घरून आणलेले लाडू-वड्या, चिवडा, खाकरे, पुरवून पुरवून खा. सलाड करायला शिका.
तुम्ही हेल्दी राहणं महत्त्वाचं आहे हे स्वत:ला पटवून द्या. तरच कॉलेजलाइफमधली लढाई जिंकू शकाल.
- अरुज गर्ग
संचालक, भुक्कड, बंगळूरू