- रोहित नाईक
दहावीला असल्यापासूनच प्रत्येकाला ओढ असते ती कॉलेजची. युनिफॉर्मच्या तावडीतून सुटका. जड दप्तरापासून सुटका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेक्चर्स बंक करण्याची मजा. या विचारानींच प्रत्येकाला हळूहळू पंख फुटत असतात. खरं, म्हणजे ज्युनिअर कॉलेज आणि शाळा यामध्ये जास्त फरक नसतो. लेक्चर्स संपल्यानंतर वर्गाच्या दरवाजावर यायलाही स्टुडंट्स दोनवेळा विचार करतात. पण, इतके घाबरले तर ते कॉलेजिअन्स कसले? जर का एकाने बंक मारण्याचा ‘निश्चय’ केला, तर त्या निश्चयाचा प्रसार लगेच इतरांपर्यंत होतो. हळूच टीचर्सची नजर चुकवून दबकत वर्गाबाहेर पडायचं आणि अशात एखाद्या शिपाई काकांच्या नजरेत पडलो तर संपुर्ण कॉलेजमध्ये वरखाली पळापळीचा खेळ सुरु करायचा, असा हा ‘अद्भुत’ उपक्रम. मग यावेळी कुठल्यातरी दुसऱ्याच वर्गात बसायचं, स्पोटर््स जिमखानामध्ये प्रॅक्टीसच्या नावाने खेळत रहायचं, इतकंच काय तर काही पराक्रमी सरळ कॉलेजच्या भिंतीवरुन उड्या मारुन सटकतात. या सगळ्या ‘मॅरेथॉन’मध्ये कोणी पकडला गेला तर त्याची हजेरी थेट प्रिन्सिपलच्या रुममध्ये. यावेळी आयडी जप्त तर होतातच, तर कधी कधी त्यावर बोनस म्हणजे घरच्यांसाठी लेटर किंवा थेट घरी कॉलंच केला जातो. पण हा प्रकार बहुतेक करुन ज्युनिअर कॉलेजमध्ये दिसतो... सिनिअर कॉलेजमध्ये असे खेळ सहसा होत नाहीत.जो काही अटेंडन्सचा परफॉर्मन्स असतो तो थेट ‘ब्लॅक लिस्ट’च्या माध्यमातून सादर होतो. शिवाय आता कोचिंग क्लासेस इतक्या फॉर्ममध्ये आहेत की, जवळजवळ सारेच विद्यार्थी क्लासेसला जात असल्याने कॉलेज लेक्चर्सकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. क्लासेसमध्ये होईल ना पोर्शन क्लिअर मग कशाला कॉलेजमध्ये लक्ष द्यायचं, असे म्हणत कॉलेजिअन्स लेक्चर्स बंक करुन ‘कट्टा मैफिली’ रंगवतात. ‘आता लेक्चर्स बंक नाही करणार, तर कॉलेजची मजा कशी घेणार?’ असे उपदेश हमखास कॉलेजिअन्सकडून मिळतात. त्यामुळेच युनिव्हर्सिटीनेही आता अटेंडन्सबाबत कडक नियमावली केली आहे आणि त्याचा रिझल्टही मिळत आहे.तरीही, यावरसुध्दा अनेकांनी बंकसाठी विशेष वेळापत्रक तयार केलं आहे. यानिमित्ताने मलाही माझ्या कॉलेज लाइफचा पहिला बंक खूप आठवतोय... एफवायजेसीला इंग्रजीचा होमवर्क केला नव्हता म्हणून हळूच वर्गाबाहेर सटकलो आणि ग्रुपसोबत बोरीवलीच्या वझीरा गणपती मंदिरातील एका कोपऱ्यात ठाण मांडली. तो बंक आजही कायम आठवणीत आहे. तुम्ही देखील असे अनेक बंक मारलेच असतील... ताुमच्याही आठवणी इथे शेअर करायला हरकत नाही.तेव्हा सांगा तुमचा पहिला बंक कसा होता?