इएसपीएन’ चॅनल नेहमी पाहणार्या प्रत्येकाला ‘स्टुअर्ट स्कॉट’ हे नाव माहितीच असतं.
पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, स्टुअर्ट स्कॉट हे इएसपीएन स्पोर्ट चॅनलचे स्टार अँँकर. या माणसाच्या आवाजात अशी काही जादू की पाहणार्यानं पाहण्यापेक्षा त्यांचं बोलणं ऐकतच रहावं. त्यांना नुकताच अमेरिकेतल्या लॉँज एंजेलीस शहरात ‘इस्पी’ अर्थात एक्सलन्स इन स्पोर्ट्स परफॉर्मन्स इयरली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तोही जिम्मी व्ही अवार्ड यांच्या नावे. आत्यंतिक चिकाटी असणार्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो. जिम्मी व्ही स्वत:ही बास्केटबॉल कोच होते. त्यांना हाडांचा कर्करोग झाला होता. मृत्यूपूर्वी दोनच महिने आधी त्यांनी आपल्या सगळ्या तरुण विद्यार्थ्यांसाठी एक भाषण केलं होतं, त्यात ते म्हणाले होते.
‘डोण्ट गिव्ह अप, डोण्ट गिव्ह अप एव्हर’
तर त्या जिम्मी व्ही यांच्यासारख्या चिवट खेळाडूच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार स्टुअर्ट स्कॉट यांना देण्यात आला. कारण सध्या स्टुअर्ट स्कॉटही कॅन्सरशी लढताहेत. गेल्या ७ वर्षांपासून त्यांचा कॅन्सरशी असलेला हा संघर्ष सुरूच आहे. आणि आजाराचा सामना करत असतानाही त्यांचं काम, त्याच्यावरची निष्ठा, त्यातला उत्स्फूर्त उत्साह अजिबात कमी झालेला नाही.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर स्कॉट यांनी एक भाषण केलं, खरंतर गप्पाच मारल्या. त्यावेळी स्कॉट म्हणाले, ‘लिव्ह, फाईट लाईक अ हेल. जगायचंय ना तर मग पराकोटीचा संघर्ष करायलाच हवा. हार मानून कसं चालेल. आपण आपली लढाई पूर्ण ताकदीनं लढलीच पाहिजे. आणि समजा आपण दमलोच, तर आपल्यासाठी लढणारी माणसं असतात, त्यांना प्रयत्न करू द्यायला पाहिजे. आपण थोडं बाजूला व्हावं, थोडा आराम करावा आणि आपल्यावर प्रेम करणार्या माणसांना करू द्यावेत आपल्याला जगवण्याचे, उमेद देण्याचे प्रयत्न. ते प्रयत्नही आपल्याला खूप मदत करतात, जगवतात. ‘मला नाहीच जमणार’ असं म्हणून हातपाय गाळून बसण्यात काहीच हाशील नसतं. तसं करण्यापेक्षा जरा श्वास घ्यावा आणि आपली माणसं जे प्रयत्न करतात त्यांना करू द्यावेत, त्यात मदत करावी. मी तरी दुसरं काय करतोय. मला जगवणारे डॉक्टर, सिस्टर्स, माझे कुटुंबीय माझ्या वतीनं माझ्या दिशेनं येणार्या मरणाशी लढतातच आहेत. मागच्याच आठवड्यात माझी एक किडनी फेल झाली. आपण उभं राहू शकू असंही वाटत नव्हतं. आजही माझ्या शरीरात असा एक अवयव नाही जिथं नळ्या आणि रॉड टाकलेले नाहीत. पण तरीही मला वाटतंय की, ही लढाई लढावी, आपल्या माणसांना लढू द्यावी. आपला आयुष्याचा प्रवास एकटा कुठं असतं, आपले अनेक जोडीदार असतात. त्यामुळे स्वत:ला एकाकी करू नका, मीच लढेन म्हणून नका, लढा, संघर्ष करा, पण त्यात आपल्या माणसांनाही सहभागी करून घेतलं तर जिंकण्याच्या शक्यता वाढतातच. त्या वाढल्या पाहिजेत.’
स्टुअर्ट स्कॉट यांचं हे भाषण ऐकून जमलेली माणसं अक्षरश: रडली. पण प्रत्येकाला एक गोष्ट कळून चुकली होती, की चिकाटी सोडायची नाही म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरणच आज आपल्याला भेटलंय.!
- चिन्मय लेले