शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

एक करंजी-एक लाडू म्हणत टेम्पो भरभरून पाडय़ांवर जाताय? -जरा थांबा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:51 IST

शहरातल्या सर्व मित्र-मैत्रिणींना आमची हीच विनंती आहे. पाडय़ावर दिवाळीत जरूर या, पण फराळवाटपखोर म्हणून येऊ नका. आम्हाला बिचारे समजून येऊ नका. दानाचे पुण्य कमवायला येऊ नका. आनंद शेअर करायला या. -जमेल?

ठळक मुद्देफराळापेक्षा माणसांनी एकमेकांच्या जवळ येणं मोलाचं हे विसरू नका. 

मिलिंद थत्ते

दिवाळी हा आपला सर्वाचा सण. प्रत्येकाची सण साजरा करण्याची पद्धत थोडी वेगळी. कुठे गूळ घालून गोड करायची रीत, तर कुठे साखर. कुठे ओलं खोबरं, तर कुठे सुकं खोबरं. कुठे तूप तर कुठे तेल.  दिवाळी साजरी करताना काकडीच्या रसात तांदळाचे पीठ भिजवून केलेली पानात वाफवलेली गोड सावळी भाकरी, घुगर्‍या आणि अर्थातच घरातल्या गावठी कोंबडय़ाची भाजी असा मस्त बेत आमच्या जव्हार-मोखाडय़ाच्या पाडोपाडी असतो. याचवेळी कांदफळे आणि चवळीची भेट घरोघरी लोक देतात. सावळी भाकरी आणि भाजीची ताटेही एकमेकांच्या घरोघरी जातात. दिवाळीआधी घरातला पुरुष बाहेरगावी कामाला गेला असेल तर परत आलेला असतो. त्याने आणलेल्या पैशांतून नवीन कपडय़ांची खरेदीही झालेली असते. शाळांना सुटी असल्यामुळे बाहेरगावी शाळेत गेलेली मुले-मुलीही परत आलेली असतात. गाव कसं भरलेलं असतं, आनंदाचं वातावरण असतं. काही ठिकाणी शेणाचा गोळा कुडावर थापून त्यावर झेंडूच्या फुलांनी शाकारलेले असते. अशी आमची पाडय़ावरची दिवाळी होत असतानाच एखादा टेम्पो येतो.. त्यातून आलेल्या लोकांनी लाडू-करंजी-चिवडा आणि काही काही वस्तू आणलेल्या असतात. आमच्या काही गावांना तर याची सवयच झाली आहे. असा टेम्पो दिसला की छोटी पोरं धावतात, गर्दी करून टेम्पोवाले जे काही देतील ते घेतात. त्यातले काही पदार्थ आम्हाला सवयीचे नसतात, आवडीचे नसतात, मग ते फेकून द्यायचे आणि आवडलेले खायचे. पुढचा टेम्पो किंवा कार आली की त्यात काय आहे हे बघून ठरवायचे, जायचे की नाही! काही कारवाले तर भराभर पाकिटं वाटतात, पोरांना तसंच उभं करून फोटो काढतात, आपला बॅनर लावतात, स्वतर्‍च कॅमेर्‍याकडे बघून हसतात. सगळी मजाच वाटते आम्हाला.. आम्ही दिवाळी कशी करतो हे बघायलाही या पाहुण्यांना उसंत नसते. आमची दारं उघडी असतात, आल्या पाहुण्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आम्ही शेतकरी असल्यामुळे जेवण मोजून वाढत नाही, जो पाहुणा येईल त्याला पोटभर जेऊ घालतो. आम्हाला जे छान वाटतं, खायला आवडतं, ते आमच्या दिवाळीत असतंच. एखादं पाहुणा सवडीनं आला तर आम्ही आमच्या मेजवानीत त्याचंही ताट वाढू की! पण हे फराळवाटे पाहुणे भलतेच घाईत असतात. त्यात त्यांना असं वाटतं की आमच्याकडे त्यांच्या आवडीचे लाडू-करंजी वगैरे नाही म्हणजे जशी काही आम्ही दिवाळीच करत नाही. खरं तर हे पाहुणे चांगल्या मनाने येत असतील, तर त्यांनी थोडा संथ श्वास घ्यावा. आमच्याकडची शुद्ध हवा भरून घ्यावी. आमच्या घरात मांडी घालून घटकाभर बसावं. आमची कांदफळं, दिवाळीतले इतर पदार्थ चाखावेत. आम्हीही त्यांच्याकडचे चाखू. सारे भारतीय माझे बांधव आहेत, हीच तर आपली सर्वाची प्रतिज्ञा आहे. मग दिवाळीसारख्या सणात भावाभावांनी एकत्र येणं, एकत्र  जेवणं, एकमेकांचे आनंद अनुभवणं- यासारखी दुसरी छान गोष्ट काय असू शकते? शहरातल्या सर्व मित्र-मैत्रिणींना आमची हीच विनंती आहे. पाडय़ावर दिवाळीत जरूर या; पण वाटपखोर म्हणून येऊ नका. आम्हाला बिचारे समजून येऊ नका. दानाचे पुण्य कमवायला येऊ नका. आनंद शेअर करायला या. तरुण असाल तर आमच्याबरोबर खेळायला या. छोटे असाल तर आमच्याबरोबर जंगल फिरायला या. कुणाकडे पाहुणे जाताना आपण खाऊ नेतोच की, तसाच थोडा फराळ घेऊनही या. (डबाभर, टेम्पोभर नाही). आणि फराळापेक्षा माणसांनी एकमेकांच्या जवळ येणं मोलाचं हे विसरू नका.     - एक पाडय़ावरचा  रहिवासी