- खेड्यातली पोरं, शहरातली हॉस्टेल्स
‘‘ जिद्द होती, म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशन पुणे विद्यापीठातूनच करायचं ठरवलं. गावातून थेट शहरात, वातावरण पूर्ण वेगळं. त्याच्याशी मिळतजुळतं घेण्याचा प्रयत्न सुरू केला पण त्यानंच शिकवलं की, न लाजता मिळेल ते काम करायचं.’’
- किशोर चौधरी सांगतो. किशोर मूळचा करंदी गावचा, पारनेर तालुका, जिल्हा अहमदनगर. घरात -वडील, मोठा भाऊ, वहिनी आणि त्यांची दोन मुलं. थोडी जिरायती शेती. त्यावरच पूर्ण घराचा उदरनिर्वाह चाले. पण शिकायची जिद्द म्हणून थेट पुण्यात येऊन त्यानं भूगोल विषयात एम. ए केलं. शहरात आल्यावर भलेभले बिचकतात. पण किशोर मात्र अपंग असूनही त्यानं कधी त्याचा बाऊ केला नाही.
किशोर म्हणतो, ‘पैसा नव्हताच, पण लक चांगलं म्हणून विद्यापीठात अँडमिशन झालं. राहण्याची सोय नव्हतीच. हॉस्टेलमध्ये राहणार्या एका मुलानं मला त्याच्या रूममध्ये रहायला दिलं अन् मी झालो पॅरासाईट. घरचे दर महिन्याला दीड-दोन हजार रुपये पाठवायचे. पण त्यात भागायचं नाय. त्यामुळे विद्यापीठात आर्थिक मदतीसाठी राबवण्यात येणार्या ‘कमवा आणि शिका’ या योजनेत भाग घेतला. त्यातून दररोज काम करून दर महिन्याला १८00 रुपये मिळायचे. या पैशांमधून दरमहिन्याचा खर्च भागवायचो. रोज सकाळी ६ ते ९ या वेळेत कमवा-शिका मध्ये दिलेली कामं करावी लागायची. मी बागेमध्ये खड्डे खोदण्याचे, गवत काढण्याचे काम करायचो. पण कितीही केलं तरी पैसे पुरायचे नाहीतच. चप्पल तुटली तरी नवीन घेण्यासाठी पैसे नसायचे. मग मित्राची चप्पल उधारीवर मागून घालून जायचो. बाहेर कुठे जायचे असले आणि चांगले कपडे नसले तर तेही मित्राकडून मागायचो. अभ्यास लायब्ररीत करायचो. पण त्याची फी देण्यासाठी कधी पैसे नसायचे मग मित्राचे लायब्ररीचे कार्ड घ्यायचो आणि त्यावर लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचो.
-हे असे जिवाभावाचे मित्र भेटले म्हणून निभावलं गेलं सारं. या हॉस्टेल लाइफनं असं जिवाला जीव देणं शिकवलं.’’
सिनेमात पाहिलेले कॅम्पस, त्यातलं हॉस्टेल लाइफ, एरवी छापून येणारे हॉस्टेल लाइफमध्ये फुल्ल धम्माल करण्याचे किस्से. पण सगळ्याच मुलांसाठी हॉस्टेल लाइफ अशी मज्जा नसते. मरमर करत जगवणारी, उपाशी राहून पुस्तकं वाचायला लावणारी, दुसर्याच्या खोलीत लापटासारखं राहत बिनाचप्पल कॅम्पस तुडवायला लावणारी एक जगण्याची शाळा असते. आणि त्या शाळेत येतात ती खेड्यापाड्यातली, गरिबाघरची मुलं. दोनवेळा जेवायला घालणार्या मेसचे पैसे मोजता येतील इतपत पैसे पाठवणंही अनेकांच्या घरच्यांना जमत नाही. तरी ही मुलं मुंबई-पुण्यासारख्या शहरात स्वत:ला रुजवतात. वाट्टेल त्या हिकमती करतात, पाण्यात बिस्किट बुडवून खात दिवस ढकलतात; पण आपापलं शिक्षण पूर्ण करतात. मास्टर्सच्या डिग््रया पूर्ण करून पीएच.डी.ही करायचं ठरवतात. पण एरवी शहराचं तोंडही न पाहिलेल्या या ग्रामीण मुलांना शहरी ‘कल्चर’, इथले रीतीरिवाज, वातावरण, भाषा सारंच नवीन असतं. काही जणांना ही नवी हवा पचत नाही, भयंकर त्रास होतो, आत्मविश्वास ढासळतो. त्यात आपले कपडे, भाषा, आपलं ट्रेण्डी नसणं हे सारं छळायलाही लागतं. पण तरीही एकमेकांचे हात घट्ट धरत, आपल्याचसारख्या गावाकडच्या मित्रांच्या मदतीनं टिच्चून उभं राहणं शिकतात. हे सारंच शिकवणारं हॉस्टेल त्यांना कसं भेटतं, हे सांगणारी चार मित्रांची ही गोष्ट.
- राहुल कलाल
‘आमच्या गावाकडं कसला हॅपी आणि कसला बड्डे? हॉस्टेलमध्ये पोरांनी वाढदिवस साजरा केला तेव्हा बड्डे काय असतो हे पहिल्यांदा अनुभवलं.’
हा अनुभव आहे मालेगाव तालुक्यातल्या दापुरे या छोट्या गावातून पुण्यात शिकायला आलेल्या जितेंद्र मिसरचा. त्याची जॉइंट फॅमिली. घरात आई-वडील, काका-काकू, आजी-आजोबा, भाऊ. कुटुंबाचं उत्पन्नाचं साधन शेती. तीही जिरायती. प्रतिकूल परिस्थितीतही जितेंद्रनं एम.ए. पूर्ण केलं. त्यानंतर २0१२ मध्ये पुणे विद्यापीठात येऊन जिओइनफॉर्मेटिक्स या विषयात एमएससीचे शिक्षण घेतलं.
जिओइनफॉर्मेटिक्स या विषयात एमएससी हे स्वप्नच मोठं होतं, त्यात पुणे शहरात तो पहिल्यांदाच आला. एकटा. पुणे विद्यापीठाच्या स्टॉपला उतरला. पण स्टॉपपासून विद्यापीठ कुठे आहे हेच माहिती नव्हतं. तंगडतोड करत ते शोधलं, त्यात मग डिपार्टमेण्ट गाठलं. सुदैवानं प्रवेश पटकन मिळाला, पण पैसे भरायचे तर बँक गाठायला हवी. ती सापडेना. पावसात भिजत खूप फिरल्यावर एकदाची बॅँक सापडली, पैसे भरले, प्रवेश घेतला. या सार्यात फक्त रडणंच बाकी होतं, जीव रडकुंडीला आला होताच. पण तेव्हाच ज्याच्याशी मैत्री झाली त्या तुषार शेलारने पॅरासाईट म्हणून रूममध्ये पाय ठेवायला जागा दिली आणि पुण्यातलं लाइफ सुरू झालं.
जितेंद्र म्हणतो, ‘या हॉस्टेल लाइफनं जगण्याचे सगळे लाडच संपवले, जे वाट्याला आलं ते मी आनंदानं स्वीकारायला शिकलो. फिकीर नॉट म्हणत चालत राहिलो.
‘‘जीवनात यशस्वी व्हायचं असलं तर पुणे विद्यापीठात शिक्षण घे, असं कॉलेजमधल्या शिक्षकांनी पहिल्या दिवसापासून भरवलं होतं. त्याच ध्यासानं मी पिसाटलो होतो. माझ्या गावातला एकही पोरगा तोवर पुणे विद्यापीठात शिकला नव्हता. लोकं म्हणत होते, नाहीच जमणार. पण मी जमवलं. गाव सोडलं, घर सोडलं तेव्हा कळलं, बाहेरचं जग आपल्याला कसं वागवतं ते.’’
कर्जत तालुक्यातल्या जलालपूर गावचा माधव पाटील. भूगोलात एम. ए करायचं, विद्यापीठात शिकायचं म्हणून तो पुण्यात आला. पण हॉस्टेलमध्ये ओपनसाठी पाचच जागा. त्यात त्याला रूम मिळाली नाही. पण एका मोठय़ा हॉलमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली. या हॉलमध्ये २६ मुलं राहत होती. एका बाजूला बॅगांचा ढीग लागलेला. तर दुसरीकडे जागा मिळेल तिथ मुलं झोपायची. त्यात त्यानं घरून अंथरुण-पांघरुण आणलं नसल्यानं मिळेल त्याच्या अंथरुणात तो झोपायचा. त्यात मेसचं जेवण पचेना. सतत आजारपण. पण पर्याय नव्हताच. त्यानं एक घरगुती मेस लावली आणि अभ्यासाला लागला. तो म्हणतो, ‘मिळेल ते मिळेल तसं, हेच माझं त्या काळातलं एकमेव तत्त्व होतं.’
‘‘पुण्यात आलो त्या रात्र भरसुद्धा रहायची काही सोय नव्हती. आई-वडील मोल-मजुरी करायचे, पैसे नव्हतेच. शिक्षकांनी मदत केली, मित्रांनी हातउसने पैसे दिले, ४ महिने पॅरासाइट राहू दिलं. कधी पैसे नाही म्हणून कुणाला न सांगता उपाशी झोपलो आणि शिकलो. एवढं शिक्षण एरवी फुकटात कुणी दिसलं असतं?’’
नेवासा तालुक्यातील देवगावच्या काकासाहेब गायकवाडचं हे मत. त्यानंही विद्यापीठात जिओइनफॉर्मेटिक्स या विषयात एमएससी केलं. काकासाहेब हुशार म्हणून काही काळ मामानं त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. एम. ए. पूर्ण केलं. मग विद्यापीठात पाऊल ठेवलं.
काकासाहेब सांगतो, ‘बीए, एमएचे शिक्षण घेत असतानाच पार्टटाइम काम करायचो. पुण्यात आल्यानंतर इथल्या खर्चासाठी पैसे कोठून आणणार हा प्रश्न होता. अँडमिशनलाही पैसे नव्हते. माझी परिस्थिती माहिती असल्यानं कॉलेजमधील माझे शिक्षक जाधव सर, म्हस्के सर, फकीर सर यांनी मला पैसे दिले. त्यातून माझं अँडमिशन झालं. पण रहायला कोणताही आसरा नव्हता. मात्र बोलता बोलता ओळख झाली तरी एका मित्रानं त्याच्या हॉस्टेलच्या रूमवर मला रहायला जागा दिली. ‘कमवा आणि शिका’ या योजनेत भाग घेतला आणि दररोज काम करू लागलो. त्यातून मला महिन्याला १८00 रुपये मिळू लागले. त्यातून मेसचा दीड हजार रुपयांचा खर्च आणि उरलेल्या पैशांमधून इतर खर्च भागवायचो. मेसचं जेवण चांगलं नसायचं पण तिथं २0 रुपयाला ताट मिळायचं. एवढं स्वस्त बाकी कुठं मिळणार म्हणून मिळेल ते खायचो. रविवारी मेस बंद असली की मित्र-मित्र बिस्किटं खाऊन झोपायचो.
- सारं निभावलं ते मित्रांच्या जोरावर. समदु:खीच सगळे मग आहे त्यात आनंदी रहायला शिकलो.’’