- स्नेहल बनसोडे- शेलुडकर
आमच्याकडे पुरुष स्वयंपाकघरात काम करत नाहीत. आम्ही स्वयंपाकासाठी ‘कुक’ ठेवू. आम्ही स्विगीवरून मागवू. आम्हाला किचनच्या कामाचा कंटाळा येतो. स्वयंपाकात फार वेळ जातो. - अशी सगळी कारणं आजवर सांगत धकवता आलं.कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे ही मिजास बाजूला ठेवावी लागली.किमान वरण-भात, खिचडी अथवा मॅगी करण्याशिवाय घरी असलेल्यांना सध्या पोट भरणं शक्य नाही हे लक्षात आलं. मॅगी मिळण्याचे दिवसही तसे लवकर संपले.कुटुंबात बहुसंख्य मुलींना किमान स्वयंपाक करता येतो.पण मुलगे?तरुण मुलं?ज्यांनी कधीच स्वयंपाक केला नव्हता, त्यांचं काय झालं?काही जणांनी यानिमित्तानं पहिल्यांदाच स्वयंपाकघरात पाऊल ठेवलं. कुणी कुकर लावायला शिकलं, कुणी खिचडी, वरण-भात, ऑम्लेट इथवर पोहोचले.काही जणांना मात्र त्या करण्यातली मजा लवकर समजली आणि त्यांनी खिचडीवर समाधान न मानता बिर्याणीपासून ते पराठे, डोसे-केक असे वेगवेगळे पदार्थ करायचे ठरवलं.आता या स्वयंपाक-कलेत आपण मास्टर होऊ असं म्हणत एकेक प्रयोग उत्साहानं सुरूकेले.त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. जरा गप्पा मारल्या. *** पुण्यात राहणारा कृतार्थ शेवगावकर. इंजिनिअर आणि नाटय़ कलाकार. मूळचा औरंगाबादचा. नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आहे.लॉकडाउन सुरू होण्याच्या आधी इतर अनेक बॅचलर्सप्रमाणो कृतार्थही मेसमध्ये जेवत होता; पण 21 दिवसांचं लॉकडाउन सुरू झालं, आणि मग तो जरा चपापलाच. घरात गॅस होताच, आवश्यक तो किराणा आणून आता स्वत:च स्वयंपाक करून पाहूयात, असं त्यानं ठरवलं. कृतार्थ सांगतो, ‘लहानपणापासून आई-आजी यांना स्वयंपाकघरात काम करताना मी निरीक्षण केलेलं होतंच, तेच आठवत-आठवत गरज पडेल तेव्हा फोन किंवा व्हिडीओ कॉल करून मी बेसिक स्वयंपाकाची सुरुवात केली. सुरुवातीला मसाला खिचडी, मग कणकेचा अंदाज घेत हळूहळू पोळ्या, बेसिक फोडणीच्या भाज्या केल्या. चवीला चांगलं लागतंय हे कळल्यावर भीड चेपली आणि मग यू-टय़ूब, मित्न-मैत्रिणी आणि घरच्यांसोबतचे कॉल यासोबत मी रोज वेगवेगळे प्रयोग करायला लागलो.’साध्या वरण-भातापासून सुरू करत आता त्यानं वरणफळं, आलू पराठा, पुदिना पराठा, छोले, वांग्याचे काप इतकंच नव्हे तर कुकरमध्ये केकसुद्धा करून पाहिलाय. मी केलेली भरल्या वांग्याची भाजी तर मलाच बेहद आवडली होती, असं तो आवजरून सांगतो.कृतार्थ म्हणतो, ‘स्वयंपाक करताना माझा वेळ फारच चांगला जातो, गेल्या महिन्याभरात मी जवळपास रोज नवा पदार्थ करून पाहिला. त्या वेळात आपलाच आपल्याशी संवाद होतो, पदार्थ छान झाला की आपण खुश होतो. खरं तर या आनंदापासून अनेक पुरुष विनाकारण वंचित असतात. आपल्याकडे उगीचच पुरुषप्रधानतेने अमुक कामं मुलींचीच, असे गैरसमज करून ठेवले आहेत. ते ओलांडून पुरुष खरंच स्वयंपाकघरात आले तर स्व-निर्मितीचा आनंद तर मिळतोच, याशिवाय स्वयंपाक करणा:या घरातील महिलांना मदत होईल. शिवाय चांगला संवाद वाढीस लागेल.’ ***
पुण्यातील नांदेड सिटीमध्ये राहाणारं मेघ आणि डॉ. गीतांजली घोलप हे जोडपं. अफोर्डेबल कन्स्ट्रक्शनमध्ये असणा:या मेघचा स्वत:चा खोपा टेक्नॉलॉजीज नावाचा व्यवसाय आहे. सध्या मेघ आणि गीतांजलीची फेसबुक वॉल तोंडाला पाणी सुटेल अशा पदार्थानी भरून वाहतेय. हैदराबादी बिर्याणी, डबल का मिठा, गुलाब जामुन, रवा डोसा, बंबैया भेळ, घरी बनवलेले पाव. ऑलमोस्ट कोणत्याही लोकप्रिय पदार्थाचं नाव घ्या, मेघनी तो बनविलेला असेलच. म्हणूनच मेघशी बोलायचं ठरवलं. तो म्हणाला, ‘मी खरंच सांगतोय, लॉकडाउन सुरू होण्याच्या आधी मला बेसिक खिचडी, ऑम्लेट एवढेच पदार्थ यायचे; पण मी मुळात भटका आणि अस्सल खवय्या आहे. आता बाहेर कुठेही खादाडी करायला जाता येणार नाही म्हणून मग अगदी बायकोचीही मदत न घेता, मला आवडणारे पदार्थ घरीच बनवायचे ठरवले. आम्ही दोघेही मिळून कोणते पदार्थ करायचे त्याच्या चर्चा करतो आणि मग त्या रेसिपी गुगल करून प्रत्यक्षात बनवितो. माझी बायको फार नेटका संसार करते, त्यामुळे लॉकडाउन सुरू होण्याच्या आधी आमच्याकडे तिने ब:याच भाज्या वाळवून ठेवलेल्या उदा. मेथी, पालक, पुदिना, कांदा, गवार इ. त्यामुळे त्या वापरून, दुकानात सारखं जाणं टाळूनही अनेक चविष्ट पदार्थ मी बनवू शकतो. मला एखादा पदार्थ अगदी मुळापासून तयार करायला आवडायला लागलंय. उदा. सांबार करण्यासाठी विकतचा मसाला आणण्याऐवजी धणो, मिरच्या, डाळी, खोबरं इ. वापरून घरीच ताजा मसाला केला की अप्रतिम चवीचं सांबार तयार होतं, हा शोध मला लागलाय. हैदराबादी बिर्याणी तर इतकी उत्तम झालेली की अक्षरश: शेजा:यांचा फोन आला, काय बनवलंय, आम्हालाही पाठवा. साउथ इंडियन, मुघलाई, पंजाबी, चायनीज अशा सर्व रेसिपीज आम्ही करून पाहतोय. मला त्यात खूप मजा येतेय. आपल्या हाताने आपल्या माणसांसाठी पदार्थ बनवण्याचा आनंद अद्वितीय असतो.’मेघ सध्या सगळ्या प्रकारचे मसालेही तयार करायला शिकतोय.***ही झाली काही उदाहरणं. या काळात अनेक तरुण मुलं पहिल्यांदाच स्वयंपाकघरात गेले. त्यांनी काही पदार्थ करून पाहिले.पदार्थाचे पोत, रंग, गंध, त्यांच्या हाताला लागले. थोडी वाफ आली हातावर, किंचित चटके बसलेही असतील, मात्र ही पोट भरणारी सुंदर कला त्यांना गवसली असेल. त्यातला आनंद कळला असेल. म्हणतात ना,कर के देखो, अच्छा लगेगा!!(स्नेहल मुक्त पत्रकार आहे.)