दिवस कसे वार्यावर फुर्र उडून जातात कळतही नाही, निम्मं वर्ष संपलं की, जुलै संपत आला.
पावसाळ्याचं म्हणाल तर आषाढ सरला, श्रावण आला.
म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर सगळा फेस्टिव्ह मूड आता येणार.
श्रावण सेलिब्रेशनमध्ये मुली वेड्या होणार (त्यात काय वेडं व्हायचं असं मुलं म्हणतील, पण ते त्यांना नाही कळणार, सिम्पल है यार, सेलिब्रेट करनेवालोंको बहाना चाहिए, समझा करो. तरुण मुलं कसं कारण नसताना पाटर्य़ा करतात, तसंच हे.)
तर श्रावण, मग दहीहंडी, मग गोपाळकाला, गणपती. सुरूच होणार आता एकमागून एक सेलिब्रेशनचा दणका.
पूर्वी (खरंतर अनेक घरांत आजही) शुक्रवारी घरात श्रावणाची सवाष्ण जेवायला घालायची पद्धत होती. मस्त पुरणावरणाचा स्वयंपाक व्हायचा. दुपारी मस्त पुरणाच्या पोळ्या खाऊन ताणून दिलं जायचं. त्यात शुक्रवारी गूळ-फुटाण्याचा मस्त प्रसाद मिळायचा. आता तसलं काही फार कुणी करत नाही, शुक्रवारची सवाष्ण रविवारी (वेळात वेळ) काढून जेवायला यायला लागली, तर बाकीचं काय.?
तर मुद्दा काय, आपण श्रावणातलं सेलिब्रेशन नवं करून पुन्हा करायला तर घेतलं, पण या सेलिब्रेशनमध्ये नवं आपण काय करणार?
केलाय काही विचार?
म्हणजे एकवेळ न जेवणं, चप्पल न घालणं, उपास करणं, नॉनव्हेज सोडणं हे सारं जुनंच झालं तसं.
आता नवीन काय करणार?
सोचा है कुछ?
करायचं म्हटलं तर बरंच काही करता येईल, यंदा अजून पुरेसा पाऊस झालेला नाही, लोक दुष्काळात होरपळताहेत, त्यांना आपण काय मदत करू शकू?
अनेक ठिकाणी दुष्काळामुळे शाळकरी मुलांना अजून वह्या-पुस्तकंसुद्धा पालक घेऊन देऊ शकलेले नाहीत, त्यांना काही मदत करता येईल?
फार काही नाही तर आपल्या जवळपासच्या टेकडीवर श्रावणात नियमित जाऊन आपणच लावलेली झाडं आपल्यालाच जगवता येतील?
विचार करून पहा. तुमचं तुम्हालाच खूप सुचेल. सेलिब्रेशनला एक नवा आयाम, नवा आनंद तुम्ही देऊ शकाल का.?
मनात आणलं तर यंदाचा श्रावण आपल्याला अधिक यादगार सहज करता येईल.
सोचो. सोचो.
-ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com