प्राची पाठक
शाळेत असेर्पयत चित्र जरा वेगळं असतं. शाळा जवळ असेल तर आपण हौशीनं सायकलनं शाळेत जातो. शाळा घरापासून थोडी लांब, दहा, पंधरा, वीस किलोमीटरवरच्या अंतरवर असेल, तर रोजची व्हॅन, रिक्षा वगैरे लावलेली असते. शाळा संपून कॉलेजात प्रवेश घेतला की मग मात्र आपल्याला नव्या बाइकचे वेध लागतात. सायकल, रिक्षा या गोष्टी कमीपणाच्या वाटायला लागतात. काहीही झालं तरी, कॉलेज अगदी पायी जाण्याच्या, दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर, आई-वडिलांची ऐपत नसली तरी ‘मला बाइकच पाहिजे’ असा हट्ट सुरू होतो. पालक बर्याचदा मुलांचा हा हट्ट पुरवतातही; पण तो जर पालकांना पुरवता आला नाही, तर आपले रुसवे-फुगवे सुरू होतात. त्याचा राग शिक्षणावर काढायला सुरुवात होते. ‘मला आता शिकायचंच नाही, गाडी असेल तरच मी कॉलेजला जाणार’ असं सांगून बर्याचदा पालकांना ब्लॅकमेलही केलं जातं; पण वेगळ्या पर्यायांचा विचार केला जात नाही. त्यातही एक वेगळा आनंद, शिक्षण आणि अविस्मरणीय अनुभव मिळू शकतो, हे लक्षातच घेतलं जात नाही.
* काय करता येईल?दर आठवडय़ात किमान एकदा तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने आपल्याला प्रवास करता येईल. करून तर पाहा. सुरुवातीला जरा बोअरिंग वाटेल, त्रास होईल. दगदग वाटेल, चिडचिड होईल; पण त्याचीही सवय होईल. त्यातली मजा तर कळेलच, पण माणसंही कळायला लागतील.जे अगदी घरापासून गाडी घेऊन रोज बाहेर पडतात, त्यांना आपण सांगू शकतो की दर आठवडय़ात एकदा तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करून बघा. आपली गाडी आपल्यासाठी उपलब्ध नाहीये, असं समजून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने, बसने, शेअर रिक्षाने, लोकलने कॉलेजला, जॉबवर जाऊन बघा. म्हणजे मुद्दा काय की आपल्या कम्फर्ट झोनमधून जरा बाहेर येऊन पाहा.
* त्याने काय होईल?1- नेहमीपेक्षा वेगळे ऑप्शन्स काय आहेत, असतात, ते कळेल. 2- आपल्याही नकळत पर्यावरणाचा विचार होईल. 3- आपल्या रोजच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर ‘अरेच्चा, इथे हेही आहे की’ असा साक्षात्कार होईल ! 4- रूटीनला जरा ब्रेक मिळेल. नव्या वाटा कळतील. 5- आपला मेंदू कायम नवीन काहीतरी शोधत इव्हॉल्व्ह होत असतो. त्याला झकास तजेला मिळेल .