प्राची पाठक
‘नाइट मारली’.. हा शब्द तसा सगळेच वापरतात.नाइट मारणं वगैरे प्रकार कॉलेजात खूप केलेले असतात. अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीर्पयत अभ्यास तुंबून ठेवायचा. आज करू, उद्या करू म्हणत. मग परीक्षेच्या आदल्या रात्नी जागून जशी जमेल तशी तयारी करून परीक्षा द्यायची. त्यात काही गडबड झाली की परत म्हणता येतं, रात्नी झोप नीट झाली नाही, तर काही आठवलंच नाही!आणि त्या परीक्षेत पास झालं तर प्रौढीने सांगता येतं, मी तर केवळ एकच नाइट मारली!म्हणजे, त्या त्या विषयांत आपल्याला खरोखर काही आवड आहे का, त्यात नवीन काय काय आपण आनंद घेत शिकलो, हे सोडून किती स्वस्तात तो विषय काढला आणि मार्क मिळवले, अशा गमजा वरतून.सध्याच्या लॉकडाऊन काळात आपण काय करतोय?
‘लवकर निजे, लवकर उठे, धनसंपदा त्याला मिळे’, हे वाक्य कितीही बाळबोध संस्कारी गटात मोडणारं वाटलं तरीही ते अतिशय खरं आहे. आपल्याला नवीन काही शिकायचं असेल, तर ते शोषून घ्यायला मेंदू अतिशय ताजातवाना हवा. आपण खूप प्रयत्नाने ते शिकलो की त्यानंतर मेंदूमध्ये त्या माहितीवर प्रक्रि या होते. त्यासाठीसुद्धा पुढची झोप आवश्यक असते. मनाची एकाग्रता साधल्याशिवाय नवीन काहीच उत्तमरीत्या, चटकन असं शिकता येणार नाही. शरीर काहीतरी कुरबुर करत राहील. आपल्याला अमुक गोष्ट समजली आहे, असं तेव्हा पुरतं वाटेल; पण नंतर मात्न काहीच आठवणार नाही. एरव्ही जे आपण फ्रेश मूडमध्ये चटकन करू, तेच करायला व्यवस्थित झोप झाली नसेल, तर जास्त वेळ लागतो, हे आपल्या लक्षात येईल. त्याने पुढचा दिवस आळसात जाईल ते आणखीन वेगळंच! आपण शब्दश: हँग होऊन जाऊ. उगाच चिडचिड, कामात लक्ष न लागणं, एकही काम धड न होणं, हे चक्र च सुरू होईल. खूप काही इमर्जन्सी असेल आणि त्यामुळे क्वचित कधी झोप उडाली, झोप नीट घेता आली नाही, तर वेगळी गोष्ट आहे. पण रोजच्या रोजच आपण झोपेच्या एकूण वेळात आणि दर्जात कपात करायला गेलो, तर त्या न मिळालेल्या झोपेचं करायचं काय, हे आपल्या शरीराला कळतच नाही. माणसाच्या शरीरात झोप न मिळाल्यावर शरीराने कोणते उपाय शोधून त्यावर मात करून पुढे चालावं, असं काही सांगणारं सर्किटच नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे न मिळालेली झोप अशी एकदम चार दिवस लोळून काढत भरून काढता येत नाही. हे म्हणजे काहीच गरज नसताना महिनाभर उपाशी राहायचं आणि एखाद्या दिवशी सगळ्या महिनाभराचं जेवून घ्यायचं, असं करणं होईल. ते जितकं अशक्य असेल, तितकीच अशक्य राहून गेलेली झोप भरून काढणं असतं. ती रोजची रोजच भरून काढावी लागते. म्हणूनच, आपलं झोपेचं शेडय़ूल नीट तपासू. त्यात काय काय आव्हानं आहेत, ते बघू. झोपेचं एक वेळापत्नकच तयार करू. पलंगावर पडल्या पडल्या झोप आलीच पाहिजे, अशी स्वत:ला सवय लावू. ते सगळं कसं करायचं, हे पुढील लेखात जाणून घेऊ. तोवर आधी आपल्या झोपेला आपल्याच विचारांच्या स्कॅनरखाली स्कॅन करूया. आपल्या एकूणच झोपेविषयी काही निरीक्षणं नोंदवून ठेवूया. नाइट मारली वगैरे प्रकार झोप नाही, तर आपलं एकूणच स्वास्थ्यच खराब करणार आहेत, हे लक्षात घेऊया.. त्यामुळे आपल्या झोपेला असं वेठीस धरू नका.