- प्रज्ञा शिदोरे
5 एएम क्लब. या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच तुम्हाला कळलं असेल की हे पुस्तक कशाबद्दल आहे! ते सांगतंय, पहाटे 5 वाजता उठा!
पण थांबा, या गुलाबी थंडीत पांघरूनात गुडूप व्हायचं सोडून हे आपल्याला पहाटे 5 वाजता उठायचा सल्ला का देताहेत असं म्हणून पान उलटून टाकू नका. कारण तुम्हाला जर आयुष्यात काही करायचं असेल तर 5 वाजता उठा, नाहीतर बिनधास्त झोपा काढा.हे सांगतोय कोण?
कुणीही सांगत नाहीये हा सल्ला. तर मोठमोठय़ा नेत्यांचा, फॉच्यरुन 500 कंपन्यांच्या मालकांचा आणि ब-याचशा सेलिब्रिटीजचा लाइफ स्टाइल कोच असलेला रॉबिन शर्मा हे सांगतो आहे.
जे कदाचित आपल्या आईनं आपल्याला शंभरवेळा सांगितलं असेल. ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास ज्ञान, आरोग्यसंपदा लाभे!’. पण आपण नुसतं सांगून ऐकणा-यातले नाही ना, म्हणून आपण हे पुस्तक वाचायला हवं.
रॉबिन शर्मा त्याच्या ‘5 एएम क्लब’ या पुस्तकात 5 वाजता का उठायचं, त्याचा आपल्या शरीरावर, मनावर कसा परिणाम होतो, हे अनेक उदाहरणांच्या मदतीने सांगतो. तो म्हणतो की सकाळी 5 ते 6 हा एक तास तीन भागांमध्ये विभागा. या 20 मिनिटांच्या भागांमध्ये व्यायाम, 20 मिनिटांत दिवसभराचं नियोजन आणि उरलेल्या 20 मिनिटांमध्ये एखाद्या विषयाचा अभ्यास, असं करा. हा वेळ केवळ तुमचा असतो. दिवसाच्या या पहिल्या तासात जेव्हा सारं जग गाढ झोपलेलं असतं तेव्हा तुम्ही ऑलरेडी तुमच्या ध्येयाच्या एक पाऊल जवळ पोहोचलेले असता. कमाल की नाही!
तुम्ही हा तास कोणती तरी नवी कला किंवा कौशल्य शिकायला, एखादं महत्त्वाचं पुस्तक वाचायला, भाषा शिकायला वापरू शकता. एक ग्रीक कथा आहे, आपल्या पंचतंत्रासारखी. त्यात असं सांगितलं आहे की जी व्यक्ती तयारीत अधिक लक्ष घालते, ती युद्धात रक्त गाळत नाही. तर हा वेळ तुम्ही तुमचं व्यक्तिमत्त्व घडवायला वापरा!
असं म्हणतात की एखादी नवी सवय लागायला ती गोष्ट सलग 21 दिवस करायला हवी. चला तर मग, नवीन वर्षात सकाळी लवकर उठायची सवय स्वत:ला लावायचं ठरवू तरी आताच.