प्राची खाडे, स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर -
नवीन वर्ष जवळ आलं की, मनाचा एक नेहमीचा खेळ सुरू होतो. या वर्षी ज्या चुका केल्या त्या पुढच्या वर्षी करायच्या नाहीत. कपड्यांच्या बाबतीत तर आपण हे नेहमीच मनाशी ठरवतो. स्टायलिश रहायचं म्हणतो.
मात्र, तसं करायचं असेल तर काही गोष्टी पुढच्या वर्षी करा, काही अजिबात करायच्या नाहीत असं पक्कं ठरवा.
पण त्यासाठी करायचं काय आणि ठरवायचं काय, हे तरी नक्की माहिती हवंच.
हे कराच.
१) नुस्ते ब्रॅण्डेड कपडे घेणं पुरेसं नाही, तर तुमच्या पूर्ण स्टाइलचा विचार करा. कपडे, बूट, कानातले-गळ्यातले, बेल्ट्स, हेअरस्टाइल असा संपूर्ण विचार करून तुम्हाला ‘कसं’ दिसायचं हे ठरवा. एकेक गोष्ट घ्या. पण ती तुमच्यासाठी वेगळीच दिसली पाहिजे.
२) कितीही बडा ब्रॅण्ड असो, तुम्हाला ड्रेस कितीही आवडो, घालून पाहिल्याशिवाय घ्यायचा नाही.
३) तुम्ही ज्या वातावरणात काम करता, ते लक्षात घेऊनच कपडे वापरा. आपल्याला पटो ना पटो, प्रत्येक वातावरणाचे काही नियम असतात, त्यात वेगळेच दिसतील असे कपडे वापरू नका.
४) नुस्ते चकचकीत कपडे म्हणजे स्टायलिंग नव्हे. तुमची व्यक्तिगत स्वच्छता फार महत्त्वाची. दात, नखं, केस, त्वचा हे सारं स्वच्छ असलंच पाहिजे. त्याच्याकडे आधी लक्ष द्या.
५) बी कॉन्फिडण्ट, मस्त हसा, आणि तसे वावरा. अत्यंत ब्रॅण्डेड कपडे आणि चेहर्यावरून माशी हालत नाही अशा माणसांपेक्षा, साधे कपडे घालणारी पण कॉन्फिडण्ट माणसं जास्त स्मार्ट दिसतात.
हे करू नका.
१) यंदा आपलं ठरवलंय ना, बारीक व्हायचं म्हणजे व्हायचं. मग होऊच आपण बारीक. असं म्हणून स्वत:साठी एक साइज कमी कपडे घेऊ नका. आता तुम्ही ज्या साईजचे आहात, त्याच साइजचे कपडे घ्या. झालाच बारीक तर नवीन घेता येतीलच ना तेव्हा !
२) सेलिब्रिटी घालतात तसे कपडे घालण्याचा, त्यांचा ट्रेण्ड फॉलो करण्याचा अट्टहास सोडा. तुमची स्वत:ची स्टाइल तयार करा, तुम्ही जसे आहात, तसे कपडे घाला.
३) अर्थात म्हणून नवीन फॅशन ट्रेण्डस, कट्स, कलर्स, ब्रॅण्डस ट्रायच करू नयेत असं नाही. काय सांगावं, त्यातलंच काहीतरी तुम्हाला तुमचा बेस्ट लूक देईल. ट्राय करा, पण ऑफिसला, मुलाखतीला जाताना नाही. घरी.मित्रमैत्रिणींमध्ये.
४) सगळ्यात महत्त्वाचं, वाट्टेल तसे पैसे खर्च करून खूप कपडे एकदम खरेदी करू नका.
५) आवडला पॅटर्न म्हणून त्याच पॅटर्नचे चार-पाच ड्रेस एकदम घेऊ नका. पैसा खर्चून एकदम शॉपिंग करण्यापेक्षा, तुम्ही स्वत:ला काय चांगलं दिसेल, याचा विचार करून, एकेक गोष्ट घ्या. एकदम कुठलाही बदल टाळाच.