- चिन्मयी सुमित
चिन्मयी. बयो वाच!खूप वाच. जे मिळेल ते वाच.आणि शिक्षण सोडू नकोस गं बाई. शिक. निदान ती डिग्री पूर्ण कर. आणि जरा शिस्तीत वाच. अगं दोन नाटकं गाजली तुझी. फिरोदिया करंडक, एसपी कॉलेज, माई भीडे पुरस्कार मिळाला. खूप कौतुक झालं.लगेच व्यावसायिक नाटकांच्या ऑफर्सही यायला लागल्या.म्हणून लगेच हुरळून जायला हवं का?जरा थांबलीस तर? तीन वर्षे कॉलजच्या शिक्षणात किती मजा असते. शिक्षण पूर्ण कर. जे तुला खूप आवडतं. अभ्यास करायला आवडतो. कॉलेजला जायला आवडतं.पुण्यातून मुंबईत अॅडमिशन घ्यायची तर साधं मायग्रेशन सर्टिफिकिट काढायचा त्रास, मान्य आहे की ते फार कटकटीचं आहे.पण जाऊदेत, नकोच ते आता.असं म्हणून सोडून कशी देतेस.ते शिक्षण पूर्ण कर आधी.जगभर लोक लिहितात. नाटकं लिहितात, कितीतरी वाचण्यासारखं असतं. ते वाच.बयो वाच. वाचत राहा. माणसांशी बोल. जग समजून घे.थोडीशी बेफिक्री असतेच या वयात, ती जगून घे. ती परत नाही मिळत. कॉलेजचे दिवस, ते मित्र-मैत्रिणी, ती मजा, ती क्रिएटिव्हिटी हे सारं परत नाही येत. ते सारं फार सुंदर, त्यात रमायला हवंस तू!
(ख्यातनाम अभिनेत्री)