लिनकोन : विश्वचषकात कमकुवत मानल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेने बुधवारी सराव सामन्यात गत उपविजेता श्रीलंकेला पराभवाची चव चाखवत खळबळ उडवून दिली. तब्बल २८ चेंडू आणि सात गडी राखून विजयाची नोंद करणाऱ्या झिम्बाब्वेने ‘आम्हाला कमी लेखू नका’, असा जणू इशाराच दिला.लंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेत ५० षटकांत ८ बाद २७९ धावा उभारल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेने गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावर ४५.३ षटकांत तीन गडी गमावून २८१ धावा ठोकल्या. हॅमिल्टन मस्कदजाने नाबाद शतक (११७ धावा) झळकविले. पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेकडून लंकेचा पाच गड्यांनी पराभव झाला होता.मस्कदजाने ११९ चेंडू टोलवून आठ चौकार व तीन षटकारांसह नाबाद खेळी केली. ब्रेंडन टेलरने ६३ आणि सीन विलियम्स याने नाबाद ५१ धावांचे योगदान दिले. मस्कदजा- सीन यांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद ११९ धावा फटकावून विजय खेचून नेला. त्याआधी मस्कदजाने टेलरसोबत तिसऱ्या गड्यासाठी १२७ धावांची भागीदारी केली होती. लंकेकडून नुवान कुलसेकरा, सुरंगा लकमल आणि तिलकरत्ने दिलशान यांनी एकेक गडी बाद केला.लंकेच्या डावात दिमूथ करुणारत्ने (५६) आणि जीवन मेंडिस (५१) यांनी अर्धशतकी खेळी केली. सलामीचा लाहिरू थिरिमाने ३० , माहेला जयवर्धने ३० आणि दिनेश चांडीमल २९ यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. झिम्बाब्वेकडून सीनने गोलंदाजीतही चमक दाखवीत दहा षटकांत ३५ धावा देत तीन गडी बाद केले. (वृत्तसंस्था)
झिम्बाब्वेचा लंकेवर सनसनाटी विजय
By admin | Updated: February 12, 2015 02:11 IST