ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. १७ - अक्षर पटेल व हरभनज सिंग या दुकलीच्या फिरकीने झिम्बाब्वेच्या फलंदाजांना रोखले असून पहिल्या टी - २० सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ५४ धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या १७९ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला २० षटकांत सात गडी गमावत १२४ धावाच करता आल्या.
भारत व झिम्बाब्वेमधील दोन टी - २० सामन्यांच्या मालिकेला आज सुरुवात झाली असून वन डेपाठोपाठ टी -२० तही झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर अजिंक्य रहाणे व मुरली विजय या जोडीने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. अवघ्या ७ षटकांत या जोडीने ६ ६ धावा केल्या. एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मुरली विजय (३४ धावा) धावबाद झाला. त्यापाठोपाठ अजिंक्य रहाणेही ३३ धावांवर बाद झाल्याने भारताची स्थिती २ बाद ८२ अशी झाली. मात्र त्यानंतर रॉबिन उथप्पाने ३५ चेंडूत नाबाद ३९ धावा करत भारताला मजबूत स्थितीत आणले. मनिष पांडे १९, केदार जाधव ९ तर स्टुअर्ट बिन्नी ११ धावांवर बाद झाले. हरभजन सिंगने नाबाद ८ धावा केल्या. भारताने २० षटकांत पाच गडी गमावत १७८ धावा केल्या.
भारताप्रमाणेच झिम्बाब्वेची सुरुवातही चांगली होती. चामू चिभाभा व हॅमिल्टन मसकद्जा या जोडीने संघाला अर्धशतकी सलामी दिली. या जोडीने ८ षटकांत ५५ धावा ठोकल्याने झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र हरभजन सिंगने चिभाभाला २३ धावांवर बाद करत सलामीची जोडी फोडली. यानंतर हरभजन व अक्षर पटेल यांच्या फिरकीसमोर झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी शरणागतीच पत्कारली. एक बाद ५५ अशा स्थितीत असलेल्या झिम्बाब्वेची अवस्था सात बाद ९८ अशी झाली. हरभजनने दोन तर अक्षर पटेलने तीन विकेट घेतल्या. मोहित शर्माने एक विकेट घेतली. झिम्बाब्वेला २० षटकांत ७ गडी गमावून १२४ धावा केल्या.