झिम्बाब्वे
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
पावसाच्या व्यत्ययामुळे झिम्बाब्वे-न्यूझीलंड सराव सामना रद्द
झिम्बाब्वे
पावसाच्या व्यत्ययामुळे झिम्बाब्वे-न्यूझीलंड सराव सामना रद्दलिंकन : मार्टिन गुप्तिलने आक्रमक शतकी खेळी केली खरी; पण झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी सोमवारी पावसामुळे विश्वकप स्पर्धेचा सराव सामना रद्द होण्यापूर्वी न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवत विश्वकप स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणार्या न्यूझीलंडतर्फे गुप्तिलने शतकी खेळी केली. गुप्तिलचा अपवाद वगळता न्यूझीलंडचे अन्य फलंदाज धावा फटकाविण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला, त्या वेळी न्यूझीलंड संघाची ३०.१ षटकांत ७ बाद १५७ अशी अवस्था होती. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली; पण त्यांच्या फलंदाजांना मात्र स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही. अखेर संततधार पावसामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. गुप्तिलने ८६ चेंडूंना सामोरे जाताना १०० धावा फटकाविल्या. त्यात १३ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. गुप्तिलव्यतिरिक्त रॉस टेलर (११) दुहेरी आकडा गाठण्यात यशस्वी ठरला. झिम्बाब्वेतर्फे वेगवान गोलंदाज एल्टन चिंगुम्बुरा (२-२१) आणि टिनसे पनयांगरा (२-२८) यांनी ढगाळ वातावरणाचा चांगला लाभ घेतला. न्यूझीलंडचा अखेरचा सराव सामना बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे तर झिम्बाब्वेची लढत श्रीलंकेविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)