नवी दिल्ली : भारताचा डेविस चषक स्टार यूकी भांबरी याने एकेरीतील अव्वल शंभर टेनिसपटूंमध्ये स्थान प्राप्त केले आहे. महिला दुहेरीत सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस आपले नंबर वन स्थान राखून आहेत. एटीपीने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमावारीत त्याने ६ क्रमांकाने सुधारणा करून ९९ व्या स्थानी झेप घेतली आहे. या वर्षीची त्याची ही सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. भांबरी या वर्षीच्या सुरूवातीस ३१५ व्या स्थानी होता. सप्टेंबर महिन्यात त्याने आपल्या सर्वश्रेष्ठ १०४ व्या स्थानी झेप घेतली. कामगिरीतील सातत्यामुळे त्याने अव्वल शंभर खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. भारताच्या सोमदेव देववर्मन याने २०१०मध्ये अव्वल शंभर खेळाडूत स्थान मिळविले होते. त्या नंतर अशी कामगिरी करणारा भांबरी पहिला खेळाडू ठरला आहे. खराब कामगिरीमुळे सोमदेवच्या क्रमवारीत घसरण होत असून, सध्या तो १८१ व्या स्थानी आहे. साकेत मिनैनी याच्या क्रमवारीत दोन अंकांनी सुधारणा झाली असून, तो १६६ व्या स्थानी पोचला आहे. व्हिएतनाममध्ये किताब जिंकल्यामुळे त्याने पुढील क्रमांकावर झेप घेतली आहे. शंघाई मास्टरमध्ये दुहेरीच्या उपांत्यफेरीत धडक मारूनही रोहन बोपन्ना याला दोन अंकांचे नुकसान झाले आहे. तो १५ व्या स्थानी आहे. भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएंडर पेस याने आपला ३६वा क्रमांक कायम राखला आहे. महिला दुहेरीत सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस अव्वल स्थानी कायम आहेत. सानियाने या वर्षी हिंगीसच्या साथीत ८, तर एकूण नऊ किताबावर नाव कोरले आहे. या जोडीने नुकताच चायना ओपनचा किताब आपल्या नावावर केला होता.
युकी टॉप हण्ड्रेडमध्ये
By admin | Updated: October 20, 2015 02:39 IST