नवी दिल्ली : आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये ट्रॅव्हलिंग प्रशिक्षकाचा समावेश केल्यानंतर मानांकनामध्ये अव्वल १००मध्ये स्थान मिळवणारा भारतीय टेनिस स्टार युकी भांब्री आता भविष्यात एका ट्रॅव्हलिंग प्रशिक्षकाची सेवा घेणार आहे. युकीने नासीर अहमद याची ट्रॅव्हलिंग प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. त्यामुळे २०१५मध्ये युकीचे बजेट ३० लाख रुपयांवरून ५० लाख रुपये झाले आहे. आता ट्रॅव्हलिंग प्रशिक्षकाच्या नियुक्तीमुळे युकीचे वर्षाचे बजेट एक कोटी रुपये होणार आहे. जागतिक क्रमवारीत ८९व्या स्थानावर पोहोचलेला युकी म्हणाला, ‘‘हा केवळ योगायोग नसून, दुखापती टाळण्यात यश आले. ट्रॅव्हलिंग प्रशिक्षकाची सेवा घेणे हा एक जुगार होता; पण तो अनुकूल ठरला.’’युकी पुढे म्हणाला, ‘‘माझे शरीर ट्रेनरच्या मदतीने कसे कार्य करते, हे समजण्यासाठी मला दोन वर्षे लागली. त्यांची मला मसाज, स्ट्रेचेस, हायड्रेटिंग, भोजन आणि जिम ट्रेनिंग यासाठी मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे माझे काम सोपे झाले. माझ्या यशाचे श्रेय नासीरला जाते. त्यांच्या मदतीशिवायही माझी कामगिरी उल्लेखनीय ठरत होती; पण मला सातत्याने दुखापतींना सामोरे जावे लागत होते. याच कारणामुळे आघाडीच्या खेळाडूंचा सपोर्ट स्टाफ मोठा असतो. एखादा खेळाडू तर दोन प्रशिक्षकांची मदत घेतो. स्पर्धेदरम्यान मार्गदर्शन करणाऱ्या अनुभवी व्यक्तीची मला गरज आहे. पुढच्या मोसमात अशी व्यक्ती माझ्यासोबत असेल, अशी आशा आहे. मी आॅस्ट्रेलियन ओपनची पहिली फेरी गाठली; पण पहिल्या फेरीपासून चौथ्या फेरीपर्यंत कशी मजल मारता येईल, यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. मी याबाबत सोमदेवसोबत बरीच चर्चा केली आहे.’’प्रशिक्षकांवर होणाऱ्या खर्चाचा भार कोण घेणार, याबाबत युकी म्हणाला, ‘’मला कुठली आशा नाही. मी आता प्रायोजकांबाबत विचार करीत नाही. मी काय करू शकतो, यावर लक्ष केंद्रित केले आहे.’’ (वृत्तसंस्था)
युकी भांब्री ट्रॅव्हलिंग कोचची सेवा घेणार
By admin | Updated: November 6, 2015 02:33 IST