रोहित नाईक, मुंबईशारीरिकदृष्ट्या टेनिस खेळ आव्हानात्मक आहे. भारतीय खेळाडू आणि परदेशी खेळाडूंच्या शरीरयष्टीमध्ये खूप फरक असून, आपल्याकडे सोयी-सुविधा आणि योग्य प्रशिक्षणाचीदेखील कमतरता असल्याने आपले खेळाडू दुहेरीच्या तुलनेत एकेरीत अपयशी ठरतात, अशी खंत भारताची ‘टेनिस क्वीन’ सानिया मिर्झा हिने व्यक्त केली. एका खासगी वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘पिक्स स्कूल आॅफ बाँडिंग’ या कार्यक्रमासाठी ब्रँड अॅम्बेसेडर असलेली सानिया सध्या मुंबईत असून तिने यानिमित्ताने खास ‘लोकमत’ सोबत मनमोकळेपणे गप्पा मारल्या. जगभरात २०० हून अधिक देशांमध्ये टेनिस खेळला जातो. या खेळामध्ये शारीरिक व मानसिक क्षमता निर्णायक भूमिका बजावते. आपल्याकडे अजूनही उच्च दर्जाच्या सोयी-सुविधांची कमतरता असून, खेळाडूंना मिळणारे प्रशिक्षणदेखील उच्च दर्जाचे नसते. तरीही आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होतात. शिवाय बहुतेक परदेशी खेळाडू वयाच्या ८-९ व्या वर्षी खेळण्यास सुरुवात करतात, तर आपल्याकडे १४-१५व्या वर्षी खेळायला सुरुवात होते हा फरकदेखील निर्णायक ठरतो, असेही सानियाने सांगितले.आगामी २०१५ मोसमामध्ये दुहेरीत सानिया चीनच्या हसेह सू- वेईसोबत खेळणार आहे. यावर ती म्हणाली, की यंदाच्या मोसमात झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकसोबत यशस्वी कामगिरी केली. प्रत्येक दौऱ्याचा आनंद लुटला. दुर्दैवाने आम्ही आता एकत्रित खेळणार नसलो, तरी तिला भविष्यातील कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. नव्या मोसमात वेईसोबत खेळतानादेखील यशस्वी कामगिरी होईल. ती महिला दुहेरीत अव्वल क्रमांकावर राहिलेली आहे. तिच्या सोबत खेळण्यासाठी उत्सुक आहे. सध्या भारतात लीग टेनिसची धूम सुरू आहे. कोणत्याही खेळामधली ‘लीग’ स्पर्धा खेळाडूंसाठी नवी संधीच असते. मी स्वत: आयपीटीएलमध्ये दिग्गज खेळाडू रॉजर फेडररच्या संघातून खेळणार असून, त्याच्यासोबत खेळण्यासाठी खूप आतूर आहे. या लीग स्पर्धांमुळे टेनिस खेळाचा प्रसार होण्यास खूप मदत होणार असून, नवोदित खेळाडूंनी अधिकाधिक फायदा उचलावा, असा संदेश सानियाने दिला. सध्या सानियादेखील आत्मचरित्र लिहिण्यात व्यस्त आहे. त्याबद्दल तिने सांगितले, की आतापर्यंत २६-२७ भाग लिहून पूर्ण झाले असून, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घडामोडी त्यात टाकाव्या लागतात. २०१२ सालपर्यंतच्या घटना पूर्ण झाल्या असून, केवळ २०१३-१४ च्या गोष्टी बाकी आहेत.
आपल्याकडे सोयी-सुविधांची कमतरता : सानिया मिर्झा
By admin | Updated: November 21, 2014 00:31 IST