पॅरिस : प्रतिष्ठेच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वित्झर्लंडचा स्टॅनिलास वॉवरिंकाच्या रूपात या स्पर्धेला नवा विजेता मिळाला. पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात त्याने सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा ४-६, ६-४, ६-३, ६-४ ने पराभव केला. याबरोबरच करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याचे नोवाकचे स्वप्न भंगले. रॉलॅँड गॅरोस मैदानावरील झालेल्या अंतिम सामन्यात चार वर्षांतील हा त्याचा तिसरा पराभव आहे. असा रंगला सामना...जोकोविचचा करिअरमधील १६ वा ग्रँडस्लॅम फायनलमध्ये धडकला होता, तर वॉवरिंका दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळत होता. पहिल्या सेटमध्ये तो दबावात होता. त्याला पहिल्या आणि पाचव्या गेममध्ये ब्रेक पॉइंट वाचवावे लागले. जोकोविचने ४-३ ने आघाडी मिळवली होती. त्यानंतर वॉवरिंकाने डबल फॉल्ट केले. त्याने दहाव्या गेममध्ये दोन सेट पॉइंट वाचवले; परंतु जोकोविचची सर्व्हिस भेदण्यात त्याला यश आले नाही. हा सेट जोकोविचने ४३ मिनिटांत जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये वॉवरिंकाने आक्रमक खेळ केला. आठव्या गेममध्ये जोकोविचने एक आणखी ब्रेक पॉइंट वाचवला, त्यामुळे वॉवरिंकाने रागाने रॅकेट फेकली. जोकोविचने दहाव्या गेममध्ये हा सेट गमावला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने साजेसा खेळ केला नाही. त्याला तीन संधी मिळाल्या होत्या. त्यानंतर सर्व्हिस गमावल्याने तो ४-२ ने पिछाडीवर फेकला गेला. वॉवरिंकाने हा सेट नवव्या गेममध्ये आपल्या नावे केला. चौथ्या सेटमध्ये जोकोविचने ३-० अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर मात्र वॉवरिंकाने ३० स्ट्रोक लगावत पुनरागमन केले. त्यानंतर तो ५-४ ने आघाडीवर पोहोचला. अखेर बॅक हँडवर एक शानदार स्ट्रोक लगावत वॉवरिंकाने इतिहास रचला.डबल बार...३० वर्षीय वॉवरिंकाचा हा २०१४ च्या आॅस्ट्रेलियन ओपननंतरचा दुसरा ग्रँडस्लॅम आहे, तर फ्रेंच ओपन स्पर्धेवर त्याने प्रथमच नाव कोरले.१९९० मध्ये आंद्रेज गोमेजनंतर किताब जिंकणारा वॉवरिंका हा सर्वांत कमी वयाचा खेळाडू आहे. सर्बियाचा अव्वल मानांकित जोकोविचविरुद्धच्या २१ सामन्यांपैकी हा त्याचा चौथा विजय आहे, तर जोकाविचचा या वर्षातील ४४ सामन्यांतील हा तिसरा पराभव आहे. याबरोबरच त्याच्या सलग २८ सामने जिंकण्याच्या मोहिमेसही ‘ब्रेक’ लागला.
वॉव..! न्यू चॅम्प
By admin | Updated: June 8, 2015 00:58 IST