विश्वकप भारत
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
विश्वकप स्पर्धेत भारताची प्रतिष्ठा पणाला
विश्वकप भारत
विश्वकप स्पर्धेत भारताची प्रतिष्ठा पणालानवी दिल्ली : भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी देशातील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. प्रत्येक कर्णधाराचे स्वप्न असलेले जवळजवळ सर्वच धोनीने कारकीर्दीत मिळविले आहे. पण, विश्वकप २०१५ मध्ये जगातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या टीम इंडियासाठी जेतेपद राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय खेळाडूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २००७ मध्ये भारताला टी-२० विश्वकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवून देणाऱ्या ३३ वर्षीय धोनीने त्यानंतर चार वर्षांनी २०११ मध्ये वन-डे विश्वकप स्पर्धेत विजेतपद मिळवित चाहत्यांचे स्वप्न साकार केले. आता चार वर्षांनी पुन्हा जेतेपद राखण्यावर नजर केंद्रित करणाऱ्या टीम इंडियाचे यश बऱ्याच अंशी यष्टिरक्षक फलंदाजाच्या अपारंपरिक व असाधारण नेतृत्व क्षमतेवर अवलंबून आहे. यावेळी मास्टर ब्लास्टर व संघातील सर्वात अनुभवी खेळाडू सचिन तेंडुलकरविना भारतीय संघ विश्वकप स्पर्धेत सहभागी होत आहे. भारतीय संघाला सचिनच्या अनुभवाची उणीव भासणार आहे. या व्यतिरिक्त गेल्या विश्वकप स्पर्धेतील विजेत्या संघातील चार खेळाडूंना वगळून भारताने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. युवा खेळाडूंवर स्वत:ला सिद्ध करण्याच्या जबाबदारीमुळे दडपण आले आहे. भारतीय संघाचे ६६ वर्षीय प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचीही महत्त्वाची भूमिका राहणार आहे. झिम्बाब्वेतर्फे ६ वन-डे सामन्यांत प्रतिनिधित्व करणाऱ्या फ्लेचरने प्रशिक्षणामध्ये छाप सोडली आहे. १९९९ मध्ये ते इंग्लंडचे पहिले विदेशी प्रशिक्षक होते. त्यानंतर २०११ मध्ये जेतेपद पटकाविणाऱ्या संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी राजीनामा दिल्यानंतर फ्लेचर यांनी संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्र स्वीकारली. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत होणाऱ्या विश्वकप स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक नजर असलेल्या प्रमुख खेळाडूंमध्ये उपकर्णधार विराट कोहली, अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन व रोहित शर्मा आदींचा समावेश आहे. कर्णधार धोनीकडून संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे.