मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवनियुक्त अध्यक्ष शशांक मनोहर यांचा मुलगा अद्वैत मनोहरने वडिलांनी पद स्वीकारल्यानंतर भविष्यात हितसंबंध गुंतल्याचा मुद्दा टाळण्यासाठी बोर्डाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. रविवारी शशांक मनोहर यांची सर्वानुमते बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झाले होते. मनोहर यांची दुसऱ्यांदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली. पद स्वीकारल्यानंतर शशांक मनोहर यांनी क्रिकेट बोर्डाची प्रतिमा सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. मीडियाच्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या व्यवस्थापन व विधी समितीचे सदस्य अद्वैत यांनी वडिलांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा दिला. भविष्यात हितसंबंध गुंतल्याचा मुद्दा उपस्थित होऊ नये यासाठी अद्वैतने राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मनोहर यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत हितसंबंध गुंतल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. अॅडव्होकेट मनोहर यांचा मुलगा अद्वैतने याबाबत विचार करीत बीसीसीआयच्या पदाचा राजीनामा दिला. हितसंबंध गुंतल्याचा मुद्दा टाळण्यासाठी माझा मुलगा बीसीसीआयच्या सर्व पदांचा राजीनामा देईल, असे मनोहर यांनी पद सांभाळण्यापूर्वीच स्पष्ट केले होते. मनोहर यांनी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनाही याची माहिती दिल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)
अद्वैत मनोहरने सोडले बोर्डाचे पद
By admin | Updated: October 6, 2015 01:28 IST